"माझं जीवन जगणं खूप कठीण होत चाललंय", ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची झालीय बिकट अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:48 IST2025-06-17T13:47:25+5:302025-06-17T13:48:01+5:30
Manmohan Mahimkar : मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांची बिकट अवस्था झाली आहे. त्यांनी त्यांची व्यथा सर्वांसोबत शेअर केली आहे.

"माझं जीवन जगणं खूप कठीण होत चाललंय", ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची झालीय बिकट अवस्था
मराठी सिनेइंडस्ट्रीत एका ज्येष्ठ अभिनेत्याची बिकट अवस्था झाली आहे. त्यांनी त्यांची व्यथा सर्वांसोबत शेअर केली आहे. हे अभिनेते म्हणजे मनमोहन माहिमकर. ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर (Manmohan Mahimkar) यांनी बऱ्याच सिनेमात काम करून इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली. पण आता त्यांच्याकडे काम नसल्यामुळे त्यांच्यासमोर जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे. मनमोहन यांनी लोकमत फिल्मीच्या द अनटोल्ड स्टोरी कार्यक्रमात बोलताना याविषयी खुलासा केला.
मनमोहन माहिमकर म्हणाले की, आता काम नसल्यामुळे मी पोरका आहे. मला कोणीच नाहीये आणि आमची जुनी बिल्डिंग होती ती आता डेव्हलपमेंटला गेलेली आहे. पहिलं दोन-तीन वर्ष त्यांनी बिल्डरला भाडं दिलं. आता देत नाही मी एकटा राहतो. भात करतो. डाळ भात करतो फक्त कधीतरी बाहेरून चपात्या आणतो. कधीतरी भाजी आणतो आणि मटन माझं खाण्यासाठी माझ्याकडे पैसे उरलेलेच नाही. दिवस राहिलेले तर ती इच्छा मी मारून टाकतो. पैसे नसल्यामुळे साधं काहीतरी जेवतो. कधी दही भात खातो कधी लोणचं भात खातो आणि कसेतरी दिवस काढतो.
ते पुढे म्हणाले की, कोणी आता राहिलं नाहीये या वयामध्ये माझ्याबरोबर. वय झालंय ते कोण माझ्या आता बघायला तयार नाहीये. मोठा भाऊ आहे. ६९ पासून लग्न करून निघून गेला होता. त्यानंतर ५०-५५ वर्षांत कधी आलेलाच नाहीये आणि रेशनकार्ड वगैरे सगळं घेऊन गेलाय. आता त्याला माहित पडलं आमच्याकडे डेव्हलपमेंट होतेय तर माझ्याकडे आला मला जागा विकायला लावतोय. मला बोलतो तू एकतर आश्रमात जा आणि तिकडे राह जागेची वाटणी कर एवढं असताना मी त्याला सांगितलंय का मी मेल्यावरती तुला जागा मिळणारच आहे. तो काय म्हणतो मी काय तुझ्या मरणाची वाट पाहू का? त्याच्या बायकोकडे गेला. दोघं एकत्र येऊन त्यांनी मला दोघांनी कोर्टात घेतलं पुरावे नसताना. आता माझं जीवन जगणं खूप कठीण होत चाललेलं आहे.
मला वहिनीने सांगितलंय तू जर ही जागा विकून आम्हाला पैसे नाही दिले तर मी बाईमाणूस आहे. मी तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन आणि जागा मिळवून दाखवेन, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.