मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 08:57 IST2025-10-12T08:53:59+5:302025-10-12T08:57:25+5:30
मृण्मयी देशपांडेने 'मनाचे श्लोक' चित्रपटासाठी उचललं मोठं पाऊल! राज्यभरातलं प्रदर्शन थांबवलं अन्...

मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
Mrunmayee Deshpande Post: गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेविश्वात अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. अखेर शुक्रवारी १० ऑक्टोबरला हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र, या चित्रपटाच्या शीर्षकावरुन वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.चित्रपटाच्या शीर्षकाचं श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य असल्याचं काहींचं म्हणणं असल्याने त्याला कडाडून विरोध करण्यात आला. काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत शो बंद पाडले. या पार्श्वभूमीवर आता दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने मोठं पाऊल उचललं आहे.
दरम्यान, मनाचे श्लोक चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मोठं वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटाच्या शीर्षकामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या चित्रपटाचं शीर्षक आणि प्रदर्शनाबाबत मृण्मयीने मोठा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेरसिकांना याबाबत माहिती दिली आहे.
राज्यभरातलं प्रदर्शन थांबवलं अन्...
मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यामध्ये म्हटलंय,"नमस्कार! 'मना'चे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. Z MUSIC CO. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत.भेटूयात!' असं तिने या पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मृण्मयी देशपांडेने 'मना'चे श्लोक' या चित्रपटात फक्त अभिनयच केला नाहीतर तिने या चित्रपटाची पटकथा देखील लिहिली आहे. तसंच सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब ही तरुण कलाकारांची तगडी फळी आहे. त्यांच्यासोबतच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.