मिताली मयेकरची पती सिद्धार्थसाठी लांबलचक पोस्ट, म्हणाली "अनावश्यक भांडणं करून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:16 IST2025-06-16T15:13:47+5:302025-06-16T15:16:09+5:30
सिद्धार्थ चांदेकरचा फोटो शेअर करत मिताली म्हणाली...

मिताली मयेकरची पती सिद्धार्थसाठी लांबलचक पोस्ट, म्हणाली "अनावश्यक भांडणं करून..."
Siddharth Chandekar Birthday: सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरनं आपला वाढदिवस साजरा केला. सिद्धार्थ चांदेकरसाठी त्याची पत्नी मितालीनं खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही प्रेमळ आणि हृदयस्पर्शी पोस्ट सध्या चाहत्यांच्या मनाला भिडत आहे. प्रेम, मैत्री, सहजीवन आणि त्यांच्या नात्यातील गोडवा शब्दांमधून ओतप्रोत वाहताना दिसतोय. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिताली मयेकरने इन्स्टाग्रामवर पती सिद्धार्थसोबतचा फोटो शेअर केला. यासोबत तिनं लिहिलं, "आयुष्यातील गोंधळ, आनंद, वेडेपणा, रात्री उशिरा झालेल्या गप्पा, अनपेक्षित प्रवास असो की घरातील शांतता... माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांमध्ये तू असतोस. तू फक्त माझा नवरा नाहीयेस, तर माझा जोडीदार, माझा सगळ्यात चांगला मित्र आणि एकमेव असा माणूस जो मला खरंच समजतो. तुझ्यासोबत अगदी शांतताही पूर्ण वाटते. तुझ्यासोबत सगळं अर्थपूर्ण होतं".
पुढे तिनं लिहलं, "आपल्या आयुष्यात असे काही दिवस असतात, जेव्हा आपण पोट दुखेपर्यंत हसतो आणि असेही दिवस असतात जेव्हा आपण एकमेकांना शांतपणे धरतो. कारण शब्द पुरेसे नसतात. खरं सांगायचं तर, तू माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणही पाहिले आहेस आणि मला अगदी गोंधळलेल्या अवस्थेत पाहिलं आहेस. तरीही माझ्यावर तेवढेच प्रेम केले आहे".
तिनं लिहलं, "तुझ्या वाढदिवशी मी फक्त तुझे आभार मानू इच्छिते. तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात सेफ जागा आहेस. नेहमीच अत्यंत प्रेमळ अन् खंबीरपणे तू माझ्या पाठिशी उभा राहतोस. अजून काय हवं. आपल्या आयुष्यातील सगळी स्वप्नं पूर्ण होवोत, आपल्याला नेहमीच रात्री उशिरा काहीतरी वेगवेगळं खायची इच्छा होवो. अनावश्यक भांडणं करून, कॉफी शेअर करून आपण असेच कायम एकत्र राहुयात. आय लव्ह यू... हे प्रेम मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही", असं मितालीनं म्हटलं. यासोबतच "उशिरा पोस्ट शेअर केली, कारण आम्ही वाढदिवस सेलिब्रेट करण्यात व्यग्र होतो", अशी तळटीप तिनं दिली. मितालीच्या पोस्टवर सिद्धार्थने "मंकी" अशी कमेंट करत तिला रिप्लाय दिला आहे. तर या पोस्टवर चाहतेही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.