"अंड्या पाद्या म्हणून एकमेकांना हाक मारू नका", राज ठाकरेंनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरच मराठी कलाकारांना खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 05:57 PM2024-01-07T17:57:27+5:302024-01-07T18:01:26+5:30

"...म्हणून मराठी सिनेसृष्टीत स्टार नाही", राज ठाकरे स्पष्टच बोलले, नाट्यसंमेलनात टोचले मराठी कलाकरांचे कान

marathi natya sammelan mns raj thackeray said marathi actors did not give respect to each other | "अंड्या पाद्या म्हणून एकमेकांना हाक मारू नका", राज ठाकरेंनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरच मराठी कलाकारांना खडसावलं

"अंड्या पाद्या म्हणून एकमेकांना हाक मारू नका", राज ठाकरेंनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरच मराठी कलाकारांना खडसावलं

पिंपरी येथे १०० वे अखिल भारतीय नाट्य संमेलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या संमेलनात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही नाट्य संमेलनासाठी उपस्थित होते. या नाट्यसंमेलनात राज ठाकरेंनी मराठी कलाकारांचे कान टोचले आहेत. कार्यक्रमातील त्यांच्या एकमेकांशी वागण्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवत राज ठाकरेंनी कलाकरांना सुनावलं आहे. 

राज ठाकरे म्हणाले, "नाट्यसृष्टीतील सर्व कलावंतांना मला ही गोष्ट सांगायची आहे, असा विचारच करून मी आलो होतो. आपण, कृपया वाईट वाटून घेऊन नका. पण, जेव्हा मी बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो, त्यांना भेटतो. आणि आपल्या मराठी कलावंतांना भेटतो. त्यामध्ये मला काही चुका आढळतात. त्याबाबत बोलणं आवश्यक आहे. खरं तर मी यासाठी मराठी कलाकारांची बैठक बोलवणार होतो. पण, या १००व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने आज कलावंत इथे आहेत. तुम्ही कृपा करून ऐका. पहिली आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांना मान दिला नाही...एकमेकांना सगळ्यांसमोर आद्या, पद्या, शेळ्या, मेंढ्या अशा नावाने हाका मारत राहिलात. पष्प्या आलाय, अंड्या आलाय हे तुम्ही ऑन स्टेज, लोकांसमोर तुम्ही बोलत आहात. मराठी सिनेसृष्टी खूप मोठी आहे.  मराठी चित्रपटात कलावंत आहेत. पण, चित्रपटसृष्टीत स्टार नाही. तुम्ही इतर कोणतीही सिनेसृष्टी घ्या. सगळीकडे स्टार आहेत. मराठीतही होते. आजही काही कलाकारांकडे स्टार बनण्याची क्षमता आहे. पण, कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटल्यानंतर कोणत्याही नावाने हाक मारतात. तुम्हीच जर तुमचा मान राखला नाहीत, तर लोक तुम्हाला का मान देतील?" 

"रजनीकांत आणि इलायराजा रात्री एकत्र बसून दारू पित असतील. पण, ऑन स्टेज आल्यावर ते सर म्हणून आदराने एकमेकांना हाक मारतात. त्यांचे कितीही घनिष्ठ संबंध असले तरी ते कार्यक्रमात एकमेकांना सन्मानपूर्वक वागवतात. मराठी कलाकारांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जर एकमेकांना मान दिला तर लोक तुम्हाला मान देतील, अन्यथा तो मिळणार नाही. तुम्ही जर नाक्यावर उभे राहिलात तर लोक तुम्हाला पैसे देऊन बघायला येणार नाहीत. आजपर्यंत अशोक सराफ मला नाक्यावर उभे राहिलेले दिसले नाहीत. कलावंतांनी मोठेपण जपलं पाहिजे. तुम्ही लोकांसमोर येता तेव्हा मान देऊनच बोललं पाहिजे. तरच मला वाटतं या नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीला भविष्य आहे," असं म्हणत राज ठाकरेंनी मराठी कलाकारांचे कान टोचले आहेत. 

Web Title: marathi natya sammelan mns raj thackeray said marathi actors did not give respect to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.