"एका पुरुषाने सखीसमोर वाईट...", सुव्रत जोशीने सांगितला गोरेगावच्या ओबेरॉय मॉलजवळ घडलेला 'तो' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:24 IST2025-07-15T15:18:41+5:302025-07-15T15:24:20+5:30
सुव्रत जोशीने सांगितला गोरेगावच्या ओबेरॉय मॉलजवळ घडलेला 'तो' प्रसंग, म्हणाला-"एका पुरुषाने..."

"एका पुरुषाने सखीसमोर वाईट...", सुव्रत जोशीने सांगितला गोरेगावच्या ओबेरॉय मॉलजवळ घडलेला 'तो' प्रसंग
Marathi Actor Suvrat Joshi: अभिनेता सुव्रत जोशी (suvrat joshi) आणि सखी गोखले (sakhi gokhale) हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असणारं जोडपं आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून हे दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्याचदरम्यान त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. साल २०१९ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधत अनेकांना आश्चर्यचकित केलं. त्यात आता नुकतीच या कपलने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या अभिनय प्रवासाचे तसेच मैत्रीचे किस्से शेअर केले आहेत.
नुकतीच सुव्रत जोशी आणि सखी गोखलेने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलखतीमध्ये सुव्रतने सखीसोबत गोरेगाव येथील ओबरॉय मॉल घडलेला वाईट प्रसंगाविषयी सांगितलं. त्यावेळी तो म्हणाला, "एकदा असं झालं की आम्ही सगळ्यांनी भेटायचं ठरवलं. त्यावेळी गोरेगावच्या ओबेरॉय मॉल जवळ सखीला एक विचित्र अनुभव आला. एका पुरुषाने वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने समाजात किंवा जगभरातच तिथेही काही पुरुष असतात त्यांना कळत नाही की आपण काय करतोय. बायकांना त्रास देणं म्हणजे पुरुषत्व सिद्ध करतोय असं त्यांना वाटतं. त्यावेळी सखीला खूप वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. ती एकदम घाबरली होती. पण, तिने तेव्हा सगळ्यात आधी कोणाला फोन केला असेल तर तो मला केला. कदाचित माझ्याजवळ व्यक्त झाल्यानंतर तिला सुरक्षित वाटलं. त्यावेळी आमची मैत्री झाली होती आणि आम्ही एकमेकांना आवडायला लागलो होतो."
पुढे सुव्रत म्हणाला, "बऱ्याचदा अनेकांना असं वाटतं की, आपल्या बायकोला किंवा प्रेयसीला धाक वाटावा म्हणजेच आपलं त्यांच्यावर प्रेम आहे किंवा हक्क आहे असा गैरसमज अनेक पुरुषांच्या मनात असतो. जो मला अजिबतच योग्य वाटत नाही. आपल्या जोडीदाराबरोबर प्रत्येक क्षणी आपल्याला सुरक्षित वाटलं पाहिजे ती भावना निर्माण झाली पाहिजे. मी कुठल्याही प्रसंगी याचा हात धरू शकते, याला मिठी मारु शकते किंवा याच्याशी दोन शब्द बोलू शकते. हा जो विश्वास तिने माझ्यावर दाखवला तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. मला तेव्हा पहिल्यांदा असं वाटलं की हे काहीतरी मैत्री पेक्षा वेगळं नातं आहे." असा खुलासा सुव्रत जोशीने मुलाखतीत केला.