मराठमोळ्या या अभिनेत्रीने बालपणी चक्क भंगारवाल्याला दिले खऱ्या हिऱ्यांचे कानातले, मग घडलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:07 IST2025-10-04T16:06:24+5:302025-10-04T16:07:09+5:30
अभिनेत्रीने नुकताच तिच्या आयुष्यातील एक निरागस पण भावनिक किस्सा सांगितला आहे. लहानपणी त्यांनी चक्क भंगारवाल्याला अस्सल हिऱ्याचे कानातले देऊन टाकले होते.

मराठमोळ्या या अभिनेत्रीने बालपणी चक्क भंगारवाल्याला दिले खऱ्या हिऱ्यांचे कानातले, मग घडलं असं काही...
हिंदी आणि मराठी कलाविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकताच त्यांच्या आयुष्यातील एक निरागस पण भावनिक किस्सा समोर आला आहे. लहानपणी त्यांनी चक्क भंगारवाल्याला अस्सल हिऱ्याचे कानातले दान केले होते.
निशिगंधा वाड अगदी लहान असताना त्यांच्या घरी भंगार घेणारे एक वयस्कर गृहस्थ आले होते. त्या आजोबांची परिस्थिती पाहून छोट्या निशिगंधा यांना त्यांची खूप दया आली. त्यांना वाटले की, आपण या आजोबांना आर्थिक मदत करायला हवी. याच निरागस भावनेतून त्यांनी विचार न करता, कपाटात ठेवलेले आईचे हिऱ्याचे कानातले त्या भंगार गोळा करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला देऊन टाकले. काही वेळाने आईला कपाटात कानातले न दिसल्याने घरात गोंधळ सुरू झाला. हे कानातले आजीने दिलेले असल्याने त्यांची आई खूप रडकुंडीला आल्या होत्या. सुरुवातीला काय झाले हे सांगायला निशिगंधा यांना धाडस होत नव्हते, पण आईला रडताना पाहून त्यांनी अखेर घडलेला प्रकार सांगितला. मुलीची ही कृती ऐकून त्यांची आईदेखील चकीत झाली.
त्यानंतर अनेक दिवस ते त्या भंगारवाल्या आजोबांची वाट पाहत होते. अखेर एक दिवस ते आजोबा कानातल्या कुड्या घेऊन घरी परतले. त्यांनी ते कानातले आईच्या हातात देऊन सांगितले, "हे तुमच्या मुलीने मला दिले होते. मी काही दिवस आजारी असल्याने येऊ शकलो नाही. मी वारकरी माणूस आहे. हे परत केले नसते, तर पांडुरंगाला काय तोंड दाखवले असते? मुलीला काही बोलू नका." आजोबा गेल्यानंतर आईने निशिगंधा यांना एक अतिशय महत्त्वाचे जीवनमूल्य शिकवले. त्या म्हणाल्या, "बाळा, प्रत्येकाने दान करावे, मात्र ते स्वतः कमावलेल्या संपत्तीमधून!" निशिगंधा वाड यांनी 'घर संसार', 'शेजारी शेजारी', 'प्रेमांकूर', 'गृहप्रवेश', 'बंधन' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.