'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:46 IST2025-08-18T18:46:15+5:302025-08-18T18:46:35+5:30

अभिनेत्रीने लांबलचक पोस्ट लिहीत राग व्यक्त केला आहे.

Marathi actress neha shitole furious over vivek agnihotri s statement on marathi food | 'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

'द काश्मीर फाईल्स' आणि आता 'द बंगाल फाईल्स' चे लेखक, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांचे सिनेमे नेहमीच चर्चेचा विषय असतात. मात्र आता नुकतंच ते एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातंय. 'कर्ली टेल्स'च्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री हे मराठी लोकांचं जेवण म्हणजे 'गरिबांचं जेवण' असं म्हणाले. वरण-भात, कढी याला त्यांनी नावं ठेवली. यावरुन विवेक अग्निहोत्रींवर लोक रोष व्यक्त करत आहेत. मराठी अभिनेत्री नेहा शितोळे (Neha Shitole) त्यांचा तोच व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

नेहा शितोळेने इन्स्टाग्रामवर 'कर्ली टेल्स'चा व्हिडिओ शेअर करत लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, "हा व्हिडिओ पाहून माझा प्रचंड संताप होत आहे. एक एक करुन सांगते...

१. मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृती विषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस... पुढे अजुन एका रील मधे हा म्हणतोय की मी सात्विक अन्न खातो... (Plant based food) (ह्याला सावजी खायला घाला आणि तांबडा पांढरा रस्सा पाजा एकदा)

२. "गरिबांचं" किंवा "किसानांचं" जेवण म्हणजे वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताच्या जवळ जवळ २५% जनतेचा जी दारिद्र्य रेषेखाली राहते त्यांचा अपमान करतो आहे... 

३. आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगते आहे... आणि मुळात आम्ही भाज्या फक्त उकडत नाही... उकडीचे मोदक सिंपल नाहीत... पुरणपोळी सिंपल नाही... 

४. ज्यांच्या घरी असं जेवण जेवतात, अश्या मुलीशी कसं लग्न करायचं हा विवेक अग्निहोत्री ला पडलेला प्रश्न आहे... 

५. आणि हे सगळं YouTube च्या माध्यमातून करोडो लोकं बघतायत... 

हा माणूस काश्मीरचं सत्य आपल्या समोर आणतो आहे म्हणून आपण ह्याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या मनात मुळात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत.. भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार आपल्याला??? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी ह्याचे सिनेमे Boycott करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना "धडा शिकवण्याचा" आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची पण ग्वाही दिली तसा आता ह्यांना कोण शिकवणार "वरण भाताची" किंमत आणि महत्त्व??? ह्या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे कारण हे पॉवर पोझिशन मध्ये बसून मराठी लोकांविषयी, भाषेविषयी वाईट, निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य करतात... त्यामुळे नाही म्हणलं तरी अनेक स्तरांवर लोकांच्या मनात कळत नकळत परिणाम होतो आणि आपण वरवर च्याच गोष्टी (theatre मिळत नाही, मराठी अनिवार्य नाही, मराठी कंटेंट OTT स्वीकारत नाही... इत्यादी) साठी भांडत बसतो... 

का भीती वाटते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची... त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का??


नेहाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सहमती दर्शवली आहे. नेटकऱ्यांना अग्निहोत्रींचं बोलणं अजिबातच पटलेलं नाही. यावरुन आता लोकांचा राग वाढताना दिसतोय. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी आता यावर काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: Marathi actress neha shitole furious over vivek agnihotri s statement on marathi food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.