"झापुक झुपूक चालला नाही, कारण...", मिलिंद गवळींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:28 IST2025-07-28T14:25:40+5:302025-07-28T14:28:00+5:30
"झापुक झुपूक चालला नाही, कारण..."; मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले...

"झापुक झुपूक चालला नाही, कारण...", मिलिंद गवळींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
Milind Gawali: केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' हा सिनेमा २९ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. 'झापुक झुपूक'मध्ये सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे अशी तगड्या कलाकारांची स्टारकास्ट होती. या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकाराने प्रचंड मेहनत घेतली होती. दरम्यान, या सिनेमाचं जोरदार प्रमोशन झालं होतं. मात्र, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. यावर आता मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
सूरज चव्हाणच्या या चित्रपटाबद्दल टीझर व ट्रेलरनंतर लोकांमध्ये जेवढी क्रेझ पाहायला मिळत होती, तेवढी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दिसली नाही. याबद्दल अभिनेते मिलींद गवळी यांनी 'टेली गप्पा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखती दरम्यान ते म्हणाले, "मला असं वाटतं झापुक झुपूक सिनेमा खूप चालला आहे. म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे न बघता या सिनेमाबद्दल लोकांना माहिती नाही असं नाहीये. हल्ली जे सिनेमे प्रदर्शित होतात त्यातले काही सिनेमे कधी आले कधी गेले याबद्दल लोकांना कळत सुद्धा नाही. पण, झापुक झुपूक प्रेक्षकांना माहिती होती. सूरज चव्हाणने झापुक झुपूक नावाचा सिनेमा केला तो महाराष्ट्रात रिलीज झाला. आजच्या सिनेमाचा ऑडियन्स हा वेगळा आहे तर रिल्सवर त्याला लाईक, फॉलो करणारा प्रेक्षकवर्ग हा वेगळा आहे. त्यातील बराचसा ऑडियन्स हा थिएटरमध्ये आला. बऱ्याचशा थिएटरमध्ये सिनेमा हाऊसफुल्ल होता. त्या -त्या भागातील थिएटर्समध्ये सिनेमाचं आणि सूरजच्या कामाचं कौतुकही झालं."
झापुक झुपूक चालला नाही कारण...
त्यानंतर ते म्हणाले, "झापुक झुपूक चालला नाही याचं कारण म्हणजे प्रेक्षकच सिनेमागृहापर्यंत येत नाही. ओटीटी माध्यमावर दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये नवनवीन सिनेमे बघायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षक घराबाहेर पडत नाहीत. बरं, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गरीब माणसाला मल्टिप्लेक्स परवडत नाही. तसंच श्रीमंत माणसाला देखील घराबाहेर पडताना विचार करावा लागतो, कारण ४-५ माणसांचं कुटुंब असेल तर त्यामध्ये दोन ते पाच हजार असेच निघून जातात. त्या पाच हजारांमध्ये माणूस पर्याय म्हणून दुसऱ्या गोष्टींबद्दल विचार करतो."
मग ते म्हणाले, "हल्ली एक ते दीड हजारामध्ये वर्षभरासाठी सबस्क्रिप्शन मिळतं. त्या प्लॅटफॉर्मवर असंख्य सिनेमे पाहायला मिळतात. शिवाय लोकांकडे आता तेवढा वेळही नाही. आता प्रवास करणं देखील खूप अवघड झालं आहे. पूर्वी आम्ही दादरवरून अनेक ठिकाणी सिनेमे बघायला जायचो. आता तुमच्या आजुबाजूला थिएटर्स आले आहेत. सध्या मी ज्या ठिकाणी राहतो तिथे जवळपास २८ थिएटर्स आहेत. त्यामुळे असं वाटतं मनोरंजन हे खूप सोपं आणि खूप महाग झालं आहे. तर ते सगळ्यांनाच परवडत नाही त्यामुळे काय पाहायचं काय नाही हे प्रेक्षक ठरवतो." असा खुलासा त्यांनी केला.