लेकाचं नाव 'जहांगीर'? कुटुंबाला ट्रोल केल्यावर चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप; दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 09:03 AM2024-04-21T09:03:00+5:302024-04-21T09:03:52+5:30

नेहा जोशी मांडलेकरने व्हिडिओची सुरुवातच स्वत:ची जात सांगत केली.

marathi actor Chinmay Mandlekar s wife Neha Joshi replied trollers over her son s name Jahangir | लेकाचं नाव 'जहांगीर'? कुटुंबाला ट्रोल केल्यावर चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप; दिलं थेट उत्तर

लेकाचं नाव 'जहांगीर'? कुटुंबाला ट्रोल केल्यावर चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप; दिलं थेट उत्तर

चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) लोकप्रिय मराठी अभिनेता आणि लेखकही आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एका पॉकास्टमध्ये मुलाखत दिली होती. यावेळी त्याच्या मुलाचं नाव 'जहांगीर' आहे हा मुद्दा पुन्हा आला. यावरुन कमेंट्समध्ये परत लोकांनी त्याला ट्रोल केलं. 'जहांगीर' नाव ठेवल्यावरुन त्याला अफगाणिस्तान, पाकिस्तानला जा असा सल्लाही देण्यात आला. या सर्व प्रकारानंतर आता चिन्मयची पत्नी नेहाचा (Neha) संताप अनावर झाला. तिने काल इन्स्टाग्रामवर व्हिडिओ  शेअर करत ट्रोलर्सला थेट प्रत्युत्तर दिलं.

नेहा जोशी मांडलेकरने व्हिडिओची सुरुवातच स्वत:ची जात सांगत केली. तसंच ट्रोल केल्यानंतर समोर एक माणूसच ती कमेंट वाचतोय, त्याच्यावर काय परिणाम होईल हे लक्षात असू द्या असंही ती म्हणाली. लेकाचं नाव ठेवण्यामागचं कारणही तिने स्पष्टच सांगितलं. 

नेहा म्हणते, "“नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. माझी जात आधी सांगते, कारण सध्या ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून मी द्वेष्टा कासार आहे. मी हिंदू आहे. हा व्हिडीओ करण्यामागचं एकच कारण आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. माझे पती, त्यांचं नाव चिन्मय दिपक मांडलेकर त्यांची जात द्वेष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने एका पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीनंतर खूप ट्रोलिंगला आम्ही सामोर जातोय. माझे पती हे पब्लिक फिगर आहेत. त्यांचं काम हे रसिक मायबाप पाहतात, ते काम आवडलं तर त्यांना रसिक मायबाप डोक्यावर घेतात आणि काम नाही आवडलं तर रसिक मायबापांना हा हक्क आहे की, त्यांनी त्यांची कानउघडणी करावी. कारण कलाकार हा सतत पब्लिक आयमध्ये असतो; जे मान्य आहे. पण सध्या ट्रोलिंग माझ्या पतीच्या कामाबद्दल होतं नाहीये. तर ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावरून होतंय.”

“तर माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म 21 मार्च 2013ला झाला. 21 मार्चला जमशेदी नवरोज असतो. तुम्ही कॅलेंडर उघडून बघू शकता. त्या जमशेदी नवरोज दिवशी त्याचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir) असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ फार गोड आहे, म्हणून ठेवली आहेत. शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणदायी कुटुंब संस्था आहे. ‘जहांगीर’ या नावाचा अर्थ आवडला. अनेक पालक आपल्या मुलाचं नाव अर्थ आवडला आणि अर्थपूर्ण ठेवतात. आता या भारतात असलेले प्रत्येक अक्षय याचं नाव काय त्यांच्या पालकांनी अक्षय कुमारवरून ठेवलं नसेल ना. अक्षय या शब्दाचा अर्थ आवडला असेल. आता सुचवणारे असे ही सुचवतात की, जगज्जेता तर मग तुम्ही पृथ्वीराज का नाही ठेवलं? किंवा तुम्ही विक्रमादित्य का नाही ठेवलं? त्याचेही अर्थ असे होतात. तर तो हक्क आम्हाला पालक म्हणून असावा. बरं दुःख काय आहे, हे मुस्लिम नाव आहे. आपण तो देश आहोत की, आपण शतकानुशतके मुस्लिम बांधवांबरोबर एकत्र राहतो. अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यात बघाल तरी आपले सुपरस्टार्स देखील मुसलमान आहेत. क्रिकेटर्स देखील मुसलमान आहेत. या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचा हजार, करोडमध्ये आपण त्यांना व्यवसाय करून देतो. ते चालतं? माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे आणि ते किती वर्ष चालणार आहे."

माझ्या नवऱ्याने बिट्टा कराटे पात्र साकारलं. तर म्हणतात, रोल फारच सिरियसली घेतला. नाव लगेच मुस्लिम ठेवलं. बिट्टा कराटेचं पात्र साकारायच्या आठ वर्ष आधी नाव ठेवलं होतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली तर म्हणतात हा काय स्क्रीनवर जिरेटोप घातलो, पण मुलाचं नाव ‘जहांगीर’चं ठेवलं. तर स्क्रीनवर जिरेटोप घालण्याआधी माझ्या मुलाचा जन्म झाला. तेव्हा त्याचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं होतं. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवून आम्ही चूक नाही केली. तो हक्क आम्हाला आहे. पण आम्हाला हे एक कळलं, महाराजांवर किंवा महाराजांच्या शिकवणीवर कितीही श्रद्धा असली, कितीही प्रेम असलं, आमच्या घरात महाराजांच्या किती प्रतिमा असल्या, बोलताना महाराजांच्या धाडसाचे दाखले आमच्या मुलांना देत असलो तरी या देशात अपुऱ्या आहेत. कारण या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचा अधिकार सगळ्यांकडे नाहीत. ते आमच्याकडे नाही. शिवाय पात्र स्क्रीनवर करण्याचा हक्क नाही. तर यासाठी मी उभा महाराष्ट्राची माफी मागते की, आम्ही आमच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ असून सुद्धा स्क्रीन महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं. आम्हाला क्षमा करा. आमची चूक झाली. आम्हाला असं वाटलेलं की, महाराज हे एका नटाच्या नावाच्या पलीकडे आहेत. त्यांचं काम, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. आम्ही चुकलो, आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवता आलं नाही.'

“आज सकाळीच एक सद्गृहस्थांचा मेसेज आला की, ‘हा देश सोडून जा. तुम्ही अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमध्ये जाऊ राहा.’ ते वाचलं आणि वाईट वाटलं. अनेक लोक सल्ले देतात, ट्रोलर्स काय मनावर घ्यायचं. पण जसं मी मगाशी बोलले मोबाइलच्या पलीकडे एक माणूस वाचत असतो. तसं हे मी नाही विसरू शकत की फोनच्या अलीकडे एक माणूसच टाईप करतोय. या देशातल्या एका व्यक्तीला, मला माझ्या मुलाच्या नावावरून हा देश सोडून जा, असं सांगण्याचा सल्ला द्यावासा वाटला. याचं मला वाईट वाटलं, याची मला खंत आहे आणि म्हणून हा व्हिडीओ आहे. परत कोणी मला असला सल्ला देऊन नये. मी भारतीय आहे, माझा नवरा भारतीय आहे, माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत. जेआरडी टाटा भारतीय होते आणि आम्ही आमच्या भारतात आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा निर्णय घेतला आहे. तो निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. या व्हिडीओनंतर ट्रोलिंग थांबणार आहे का? तर अजिबात नाही. वाढणार? तर हो, निश्चित दुप्पटीने वाढणार आहे. खूप मेसेज येणार आहेत. पण आता माझ्याकडून मी माझं काम केलंय, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. धन्यवाद,” असं म्हणत नेहाने ट्रोलर्सना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. 

Web Title: marathi actor Chinmay Mandlekar s wife Neha Joshi replied trollers over her son s name Jahangir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.