"नाव बदलण्याची गरज नव्हती, त्यांनी एका तासात...", 'मनाचे श्लोक'च्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
By देवेंद्र जाधव | Updated: October 19, 2025 11:31 IST2025-10-19T11:31:34+5:302025-10-19T11:31:53+5:30
मनाचे श्लोक सिनेमाच्या टीमने नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मोठा वाद झालेला. त्यावर आता महेश मांजकरांनी त्यांची स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे

"नाव बदलण्याची गरज नव्हती, त्यांनी एका तासात...", 'मनाचे श्लोक'च्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या सिनेमाच्या नावामुळे मोठा वाद निर्माण झाला. अनेक ठिकाणी आंदोलकांनी थिएटरमध्ये सिनेमाविरोधात निदर्शनं केली. त्यामुळे मृण्मयीने आणि सिनेमाच्या टीमने सिनेमाचं नाव बदलून सिनेमा एका आठवड्यानंतर पुन्हा रिलीज केला. 'तू बोल ना' या नवीन शीर्षकासह हा सिनेमा मृण्मयीने रिलीज केला. आता या सिनेमाच्या वादावर दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं.
लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की, ''माझं असं म्हणणंय की, मनाचे श्लोकसाठी मराठीतील बरेच कलाकार पाठिंबा द्यायला पुढे आले. पण त्यांनी एक तासात नाव बदलायचा निर्णय घेतला. थांबू दे की जरा. मी शिक्षणाच्या आयचा घोच्या वेळेस शेवटपर्यंत थांबलो. मी नाही म्हणजे नाही बदललं नाव. आपण नाव बदललं की, त्यांना पण प्रोत्साहन मिळतं की, आपण परत त्यांच्यावरती हल्ला केला की हे नाव बदलतील.''
''शिक्षणाच्या आयचा घोच्या वेळी मी काही ठरवून केलं नव्हतं. माझी एज्युकेशन सिस्टिमला शिवी होती. ती शिवी पण नव्हती, आयचा घो म्हणजे आपल्या कोकणात आईचा नवरा आहे ना! कोणाला तरी वाटलं ती शिवी आहे. पण त्याने कोणाच्या भावना दुखावण्याची गरज नाही. कोणाच्या भावना दुखावत असतील तर ते ठेवणारच नाहीत. कशाला खाजवून खरुज काढा.''
''आता मनाचे श्लोक ही मानसी आणि श्लोक या नावाची लव्हस्टोरी आहे. त्यातून तुम्ही ठेवलंत ना नाव, मग एका तासात नका बदलू. एकदा सेन्सॉरने पास केलं की, कोणी त्याच्यावरती काही करु नये या मताचा मी आहे. पण मग ठाम राहा. हिंदीमध्येही हेच आहेत ना. काही प्रपोगंडा फिल्म असतात, काही पब्लिसिटीच्या फिल्म असतात, ते आपण करु नये एवढंच मी म्हणतो.''
''कोणी एखादा सांगेल की, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी काही करु शकतो. मला एखाद्या पार्टीचं प्रमोशन करण्यासाठी सिनेमा करावासा वाटतोय, तर असो. प्रेक्षकांनी ठरवायचं की, या सिनेमाला जायचं की नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रेक्षकांनाही आहे.''