महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:49 IST2025-09-28T12:48:11+5:302025-09-28T12:49:07+5:30
आईच्या आठवणीत सत्या मांजरेकर भावुक, मित्रपरिवाराकडून श्रद्धांजली

महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं २५ सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर होत्या. अतिशय मनमौजी आयुष्य जगणाऱ्या होत्या. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अशी अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर आईच्या आठवणीत भावुक पोस्ट केली आहे. दरम्यान दीपा मेहता यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचं १९८७ साली लग्न झालं होतं. दोघंही कॉलेजपासूनच एकत्र होते. त्यांना अश्वमी आणि सत्या ही दोन मुलंही झाली. मात्र लग्नानंतर आणि मुलांच्या जन्मानंतर महेश मांजरेकर आणि दीपा यांच्यात बिनसलं आणि काही वर्षातच त्यांचा संसार मोडला. घटस्फोटानंतर काही वर्षांनी महेश मांजरेकरांनी मेधा यांच्याशी लग्न केलं. त्यांना सई ही मुलगी आहे. तर दीपा या एकट्याच राहत होत्या. त्या स्वत:चा 'क्वीन ऑफ हार्ट्स' हा साड्यांचा ब्रँड चालवत असत. त्यांची लेक अश्वमी या ब्रँडसाठी मॉडेलिंगही करते. दीपा मेहता यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने आईचा जुना फोटो शेअर करत 'मिस यू मम्मा' असं लिहिलं आहे.
इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर, अभिनेत्री शिल्पा तुळसकर या काही सेलिब्रिटींनीही स्टोरी पोस्ट करत दीपा मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच दीपा यांच्या जवळच्या मित्रमंडळींनीही सोशल मिडिया पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक फोटोत दीपा मेहता यांच्या हसतमुख चेहऱ्यावरुन त्या किती मनमौजी होत्या हे दिसून येतं. आज त्यांच्या आठवणीत सगळे भावुक झाले आहेत.