"भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका" तेजस्विनी पंडितची पोस्ट, मतदारांना केलं 'हे' आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:54 IST2026-01-13T13:52:59+5:302026-01-13T13:54:00+5:30
अभिनेत्री तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, नगरसेवकाचं महत्त्व सांगत भ्रष्ट राजकारण्यांवर साधला निशाणा

"भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका" तेजस्विनी पंडितची पोस्ट, मतदारांना केलं 'हे' आवाहन
Maharashtra Municipal Elections 2026 : सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरु आहे. विविध ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या पक्षासाठी प्रचार करत आहेत. या महानगरपालिका निवडणुकीत कलाकारही सक्रिय झाले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "आपल्या रोजच्या जीवनात नगरसेवकाची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे योग्य उमेदवार निवडा" अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे.
तेजस्विनीने आपल्या पोस्टमध्ये मतदारांना सुज्ञपणे मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तिने लिहिलंय, "आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे नगरसेवक असतात. म्हणूनच भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका. सतर्क रहा. योग्य, सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या". आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिक थेट नगरसेवकावर अवलंबून असतात. हेच लक्षात घेऊन तेजस्विनीने मतदारांना योग्य उमेदवार निवडण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यात २९ महापालिकांच्या मतदान आणि निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारीला सकाळपासून मतदान सुरु होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. तुमचे एक मत नाही, तर ४ मते नगरसेवक निवडून आणणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत नवीन ४ सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. चारही जागांसाठी मतदान केल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अन्यथा तुमचे मत बाद ठरेल. उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध आहे.