Exclusive: "बंदूक हाताळण्यापासून ते ग्रेनेड फेकण्यापर्यंत…", जवानाच्या भूमिकेसाठी ललितनं कशी केली तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 19:01 IST2025-05-11T19:01:09+5:302025-05-11T19:01:27+5:30

ललित प्रभाकर 'ग्राउंड झिरो' सिनेमात दिसला आहे. सत्य घटनेवर आधारित सिनेमात त्याची भूमिका काय? 'लोकमत फिल्मी'शी बोलताना म्हणाला...

Lalit Prabhakar Ground Zero Debut Bsf Training Kashmir Experience Emraan Hashmi Sai Tamhankar Hindi Marathi Industry | Exclusive: "बंदूक हाताळण्यापासून ते ग्रेनेड फेकण्यापर्यंत…", जवानाच्या भूमिकेसाठी ललितनं कशी केली तयारी?

Exclusive: "बंदूक हाताळण्यापासून ते ग्रेनेड फेकण्यापर्यंत…", जवानाच्या भूमिकेसाठी ललितनं कशी केली तयारी?

>>मयुरी वाशिंबे

मराठी कलाक्षेत्रातला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. छोट्या पडद्यावरून त्याने अभिनयाची सुरवात केली. त्यानंतर हळूहळू मोठ्या पडद्यावर आणि मग वेब सीरिजच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अलिकडेच ललित प्रभाकर 'ग्राउंड झिरो' ( Ground Zero ) या हिंदी चित्रपटामध्ये झळकला. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत ललित प्रभाकरही स्क्रीन शेअर करताना दिसला आहे. यानिमित्त ललित प्रभाकरनं लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधला.


'ग्राउंड झिरो' या चित्रपटात संधी कशी मिळाली, या व्यक्तिरेखेत काय पाहिलेस?

कास्टिंग डायरेक्टर श्रुती महाजन आणि दिग्दर्शक तेजस देऊस्कर हे 'ग्राउंड झिरो' चित्रपटाचे कॉस्टिंग करत होते. तर त्यांनी मला या भुमिकेसाठी विचारलं होतं आणि काही तरी वेगळं करण्याची इच्छा होती.  त्यासाठी मला हा सिनेमा अगदीच योग्य वाटला. चांगलं सेटअप आणि प्रोडक्शन हाऊस दिसलं. मी अशा चांगल्या स्क्रीप्टची वाट पाहात होतो.  

पहिल्यांदाच आर्मी ऑफिसरच्या भुमिकेत आहेत, काय सांगशील ?

आतापर्यंत मी पोलिस आणि जवान हे पात्र कधीच साकारलं नव्हतं. यासाठी मी ट्रेनिंग घेतलं. बीएसफच्या कॅम्पमध्ये आम्हाला घेऊन गेले होते. तिथे आमचं काही शुटिंगदेखील झालं. बीएसएफच्या जवानांसोबतच आम्हाला थोडं ट्रेनिंग मिळालं. सॅल्यूट कसं करायचं? चालायचं कस? बंदूका कशा हाताळायच्या, ग्रेनेंड कसं फेकायचं, अशा खूप गोष्टींचं आम्हाला त्यांनी प्रात्याक्षिक दिलं आणि आमच्याकडून करुन पण घेतलं. अगदी लहान-लहान गोष्टींचं त्यांनी आमच्याकडून ड्रील करुन घेतलं. 


  


इमरान हाश्मीसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

खूपच प्रोफेशनल होता, म्हणजे चांगल्या अर्थाने प्रोफेशनल होता. इमरान हाश्मी हे जेव्हा सेटवर यायचे, तेव्हा ते पुर्ण तयारीनिशी यायचे. स्क्रीप्टमधील जो पण सीन करत असू तो त्यांना माहिती असायचा.  त्या सीनवर ते तयारी करुन आलेले असायचे. त्यांच्यासोबत काम करताना हे दडपण कधी नाही आलं की आपण पहिल्यांदा काम करतोय. कुणाबरोबरही काम करताना ते अगदी सहजपणे काम करतात.

सई ताम्हणकर तुझी चांगली मैत्रिण आहे, तिच्यामुळे कम्फर्ट झोन निर्माण झाला का?

सईकडून एक वेगळी एनर्जी वेगळी प्रेरणा मिळतेच.  सईबरोबर मी खूप काम केलं आहे. त्यामुळे तिला पाहिलं की घरी आल्यासारखं वाटतं. आपल्याला पाठिंबा, प्रेरणा द्यायला,  कुणीतरी घरचं माणूस आलंय असं वाटायचं.

सेटवर कसं वातावरण होतं? 

सेटवरचं वातावरण खूप छान होतं. दीपिक म्हणून माझा एक मित्र होता. सिनेमात आमची तीन जणांची टीम दाखवली आहे. तर आमची चांगली गट्टी जमली होती.  तिकडे आम्हाला थोडा वेळ मिळाला तेव्हा आम्ही एक ट्रेक करून आलो. खूप छान अनुभव होता. 

शुटिंगच्या निमित्तानं काश्मीरमध्ये थांबलास, तेव्हा काही अडचणी आल्या का ?

अडचणी आल्या असं नाही. पण, तो तणाव थोडा जाणवत राहतो. तिथे सगळ्याचं गोष्टी अशा मिसळलेल्या आहेत. कुठेच पाहायला मिळत नाही, असा सुंदर निसर्ग तिथे आहे. काश्मीरची तुलना इतर कुठल्याच ठिकाणाशी होऊ शकत नाही. तिथला एक इतिहास आहे. काश्मीरमध्ये मानसिकरित्या एक वेगळं दडपण असतं, पण प्रत्यक्षरित्या आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही. 

मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम फरक वाटतो?

मराठी आणि हिंदीमध्ये फरक तर असणारचं. पाहिलं तर दोन माणसांमध्ये फरक असतो. तर मराठी आणि हिंदीमध्ये मुख्य फरक तर हा स्केलचा आहे. आपल्या सिनेमाच्या आणि हिंदी सिनेमाच्या बजेटमध्ये फरक आहे.  आपला सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होतो, हिंदी सिनेमा हा भारतभर प्रदर्शित होतो. 

कधी हिंदी सिनेमांमध्ये काम करशील असं वाटलं होतं का?

पुढे चांगली संधी मिळाली तर हिंदीमध्ये आणखी काम करायला आवडेल. मला वाटतंय फक्त कामाची भाषा बदलली आहे. हिंदीमध्ये काम करतोय, म्हणजे काही वेगळं करतोय असं मला वाटतं नाही. मला नेहमीच चांगल्या लोकांबरोबर काम करायचं असतं. त्यामुळे फार मागे वळूनही पाहात नाही. फक्त काम करत जायचंय. मला बंगाली, इंग्रजी किंवा दाक्षिणात्य चित्रपटातही काम करायला आवडेल. याचबरोबर मी माझे मराठी सिनेमेही चालूच ठेवणार आहे. एवंढच आहे की वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायचं. नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठीच मी या क्षेत्रात आलो आहे.  मालिकांमध्ये करण्यासाठी मला नाही वाटतं की आता मला वेळ मिळू शकेल. वेळेची कमीटमेंट मी आता देऊ शकत नाही. 


 

Web Title: Lalit Prabhakar Ground Zero Debut Bsf Training Kashmir Experience Emraan Hashmi Sai Tamhankar Hindi Marathi Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.