क्षिती जोगची आजीही होती दिग्गज अभिनेत्री, अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली- "तुझी नात असल्याचा अभिमान.."
By देवेंद्र जाधव | Updated: July 2, 2025 12:55 IST2025-07-02T12:55:16+5:302025-07-02T12:55:49+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोगची आजी दिग्गज मराठी अभिनेत्री होती हे फार कमी जणांना माहित असेल. क्षितीने सोशल मीडियावर आजीची आठवण जागवली आहे

क्षिती जोगची आजीही होती दिग्गज अभिनेत्री, अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली- "तुझी नात असल्याचा अभिमान.."
'झिम्मा' फेम अभिनेत्री क्षिती जोग गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'वादळवाट'सारख्या अनेक मालिकांमधून क्षितीने लोकांचं प्रेम जिंकलं. इतकंच नव्हे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातून क्षिती हॉलिवूडमध्ये झळकली. क्षिती जोगची आई आणि बाबा अभिनेते आहेत, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. क्षितीची आजी सुद्धा दिग्गज अभिनेत्री होती हे फार कमी जणांना माहित असेल. क्षितीच्या आजीचं नाव आहे शांता जोग.
क्षितीने आजीला वाहिली आदरांजली
क्षितीने सोशल मीडियावर आजीचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन क्षिती लिहिते, "शांता आज्जी... आपण कधी भेटलो नाही, मी तुला काम करताना पाहिलं नाही... हे माझं दुर्दैव... तुझ्या कामाचं कौतुक आणि तुझी प्रतिभा सगळ्यांकडून ऐकत आले... नटसम्राट, हिमालयाची सावली, सुर्याची पिल्ले, मंतरलेली चैत्रवेल आणि बरीच... ही सारी तू अजरामर केलेली नाटकं! मराठी रंगभूमीवरचं तुझं योगदान आम्हाला ठेंगणं करणारं आहे... तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत काम करण्याचा प्रयत्न करते आहे…"
"तुझे आशीर्वाद सतत सोबत असूदेत! तुझ्या हिमालयाची सावली अशीच असूदे! आज अभिमानाने 'शांताबाईंची नात' म्हणून मिरवते आहे आणि ती मोठी जबाबदारी आहे हे सुद्धा ठाऊक आहे... तू आज असतीस तर खूप काही शिकता आलं असतं बोलता आलं असतं... आज तू असतीस तर १०० वर्षांची असतीस आज्जी!
जिथे कुठे असशील तिथे खूप खुश रहा... हे तुझं जन्म शताब्दी वर्ष! तुझा वसा मी विसरणार नाही!"
कोण होत्या शांता जोग?
शांता जोग या मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री होत्या. शांता जोग यांनी 'नटसम्राट' नाटकात काम केलं होतं. या नाटकात त्यांनी कावेरीची भूमिका साकारली. शांता जोग यांचे १९८० साली मुंबई-गोवा महामार्गावर बसला आग लागल्याने अपघाती निधन झाले होते. शांता जोग यांचा लेक अनंत जोग, सून उज्वला जोग आणि नात क्षिती जोग हे त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहेत. क्षितीने खास शब्दांमध्ये आजीला आदरांजली वाहिल्याने अनेकांनी तिचं कौतुक केलंय.