"माझ्या नवीन गाडीवर काळे तिळ...", किशोर कदम यांनी सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:38 IST2025-06-03T14:38:44+5:302025-06-03T14:38:44+5:30
काळी जादू, करणी यांसारख्या गोष्टींवर आजही अनेक लोक विश्वास ठेवतात.

"माझ्या नवीन गाडीवर काळे तिळ...", किशोर कदम यांनी सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाले...
Kishor Kadam On Black Magic: सध्या जग आधुनिकतेच्या शिखरावर आहे. असे असले तरी आजही अनेक लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात (Black Magic) अडकले आहेत. अनेक लोक सध्याच्या या आधुनिक जगातही काळी जादू सारख्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. गंभीर बाब म्हणजे उच्च शिक्षित लोकही अंधश्रद्धेमध्ये अडकल्याचे पाहायला मिळतं. याचा अनुभव स्वतः ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी मुंबईसारख्या प्रगत शहरात घेतला आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये अभिनेते किशोर कदम यांनी स्वतःच्या आयुष्यातील अशाच एका घटनेचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे.
किशोर कदम यांनी नुकतंच एका चित्रपटाच्या निमित्तानं 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना जारण वगैरे प्रकार तुम्ही अनुभवले आहेत का कधी, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत ते म्हणाले, "आमच्या सोसायटीमध्ये आजही असे प्रकार होतात. गच्चीच्या कोपऱ्यात कोणीतरी कुंकू वगैरे टाकलेलं असतं. काही न काही लोक करतच असतात. आम्हाला ते २-३ लोक कोण आहेत हे माहीत आहे. पण मला कळत नाही की, ते हे कधी करतात आणि एवढा वेळ त्यांना कसा मिळतो?"
किशोर कदम यांनी त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "एकदा तर मी नवीन गाडी खरेदी केली होती, तेव्हा मी शूटिंगला जाण्यासाठी सकाळी खाली गाडीजवळ आलो आणि बघतो तर गाडीवर काळे तीळ पसरवलेले होते. मला माहीत होतं की, ज्यानं केलं आहे तो वरून बघत असेलच, तेव्हा मी ते गाडीवरचे सर्व तीळ गोळा केले आणि खाल्ले. मग गाडीत बसून शूटिंगसाठी निघालो. कारण, माझा या सगळ्यावर विश्वासच नाहीये. आजही मुंबईसारख्या शहरात हे प्रकार घडत आहे, याचं आश्चर्य वाटतं. जेव्हा मी माझ्या बायकोला याबद्दल सांगितलं, तेव्हा ती म्हणाली की, तू काहीही करत असतोस. आता काही झालं तर मला सांगू नको".