केतकी माटेगावकरला ए.आर. रहमान यांच्यासोबत गाण्याची मिळाली संधी, म्हणाली- "हा दिवस कधीच विसरणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:09 IST2025-11-26T11:08:43+5:302025-11-26T11:09:12+5:30
Ketaki Mategaonkar : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने नुकतेच संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भेटीमुळे केतकीसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला आहे.

केतकी माटेगावकरला ए.आर. रहमान यांच्यासोबत गाण्याची मिळाली संधी, म्हणाली- "हा दिवस कधीच विसरणार नाही"
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने नुकतेच संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भेटीमुळे केतकीसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या भावनांमुळे तिची ए.आर. रहमान यांच्याबद्दलचा आदर दिसून येतो.
केतकी माटेगावकरने ए. आर रहमान यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, "मी हा दिवस कधीही विसरणार नाही." 'ओ पालनहारे', 'दिल से', 'है रामा', 'के सेरा सेरा', 'बरसो रे मेघा' अशा त्यांच्या गाण्यांतून लहानपणापासून प्रेरणा घेतल्याचे तिने सांगितले. त्यांचे प्रत्येक गाणे, त्यातील प्रत्येक बारकावा, कॉर्ड्स आणि नोट्स समजून घेण्याचा तिने सराव केला. आपल्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा ती लहान असताना पालकांसोबत शोसाठी प्रवास करत असे, तेव्हा तिचा सीडी प्लेअर आणि ए.आर. रहमान सरांची गाणी हेच तिचे प्रेरणास्रोत होते. आजही तिच्याकडे त्यांच्या गाण्यांची ती संकलन सीडी असल्याचे तिने आवर्जून नमूद केले आहे. यावेळी केवळ भेट नाही, तर ज्या मंचावर रहमान यांनी जादू केली, त्याच मंचावर तिला गाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, तिला तिचे स्वत: लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले गाणे तसेच प्रिय मित्र सत्यजित रानडे याचे एक गाणे सादर करता आले. "याची पूर्ण कहाणी मी पुढील पोस्टमध्ये शेअर करेन," असे तिने चाहत्यांना सांगितले आहे.
नवीन गाण्यांना चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद
केतकीने तिच्या नवीन 'लव्ह अबव्ह ऑल' आणि 'बुंद बुंद में' या गाण्यांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. हे दोन्ही ट्रॅक्स अजून रिलीज झाले नसले तरी, तिच्या पहिल्या इंग्रजी ओरिजिनल गाण्याला (लव्ह अबव्ह ऑल) मिळालेला प्रतिसाद पाहून ती भारावून गेली आहे. अनेक रील्स तयार झाल्याबद्दल तिने आश्चर्य व्यक्त केले आणि 'कृतज्ञता' हा एकच शब्द भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा असल्याचे सांगितले.
वर्कफ्रंट
गायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतानाच, केतकी अभिनेत्री म्हणूनही मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. शेवटची ती 'टाईमपास २' चित्रपटामध्ये दिसली होती. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही चाहत्यांना उत्सुकता आहे. ए.आर. रहमान यांच्यासोबतची ही भेट तिच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरणारी आहे, यात शंका नाही.