"माझ्या घरातील चमचाही कुणी दिलेला नाही", केदार शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले- "आजोबांनी माझे खूप लाड केले, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:34 IST2026-02-07T12:34:32+5:302026-02-07T12:34:55+5:30
केदार शिंदे हे लोककलावंत शाहीर साबळे यांचे नातू आहेत. लहानपणापासूनच त्यांच्यावर शाहीर साबळेंचा प्रभाव होता. पण, आजोबा मोठे कलावंत असूनही स्वत:च्या कर्तृत्वावर त्यांनी कलाविश्वात स्थान मिळवलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं.

"माझ्या घरातील चमचाही कुणी दिलेला नाही", केदार शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले- "आजोबांनी माझे खूप लाड केले, पण..."
केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अगं बाई अरेच्चा, खो खो, बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, बाईपण भारी देवा, महाराष्ट्र शाहीर असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले. केदार शिंदे हे लोककलावंत शाहीर साबळे यांचे नातू आहेत. लहानपणापासूनच त्यांच्यावर शाहीर साबळेंचा प्रभाव होता. पण, आजोबा मोठे कलावंत असूनही स्वत:च्या कर्तृत्वावर त्यांनी कलाविश्वात स्थान मिळवलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं.
केदार शिंदे यांनी नुकतीच मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी आयुष्यातील टर्निंग पॉइंटबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले, "मी साबळेंच्या घराचा पहिला नातू. त्यामुळे मी २-३ दिवसांचा असतानाच मला बाबांनी (शाहीर साबळे) आईकडून त्यांच्या घरी आणलं. मी २३ वर्ष त्या घरात काढली. मी झोपताना आणि उठताना बाबांना बघायचो. प्रत्येक सणवाराला मग कुठलाही सण असू दे एकादशीलाही मला नवीन कपडे असायचे. आता मला माझी आई आणि मावशी या गोष्टी सांगतात. माझे खूप लाड व्हायचे. हळूहळू घरातले लोक वाढायले लागले. आमचं कुटुंब वाढू लागलं. मी लोकधारा सुरू केल्यानंतर मला जाणवायला लागलं की हा क्षण आता असा माझ्या आयुष्यात आहे की ना धड मी माझ्या आईबाबांचा आहे आणि ना मी माझ्या आजी आजोबांचा..."
"लोकधारामधून माझी जी कमाई व्हायची त्यातूनच माझं शिक्षण व्हायचं. त्यातूनच माझे कपडे घ्यायचे. त्यातून माझ्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. तेव्हा मला कळायला लागलं की मी इंडिपेंडंट होतोय. हे कोणी मला बोलून दाखवलं नाही. तेव्हा मी १३-१४ वर्षांचा असेन. तरीदेखील त्यानंतरही १० वर्ष मी त्याच घरात राहिलो. पण मला ते अंतर जाणवायला लागलं होतं. आज मी, माझी बायको आणि माझी मुलगी पवईमध्ये राहतो. पण माझ्या घरातला एक चमचाही कुणाचा नाही. घरातील एक एक गोष्ट आम्ही आमच्या पद्धतीने आणलेली आहे. कुठलीच गोष्ट मला अशी फुकट मिळालेली नाही", असंही ते पुढे म्हणाले.
केदार शिंदेंनी सांगितलं की "बाबांचं प्रस्थ नाटकात खूप मोठं होतं. ते सेन्सॉर बोर्डवर होते. तेव्हा आमच्या घरी मिटिंग्स व्हायच्या. सगळे निर्माते आमच्या घरी यायचे. मला असं नेहमी वाटायचं की बाबांनी सांगावं की हा एकांकिका करतो. याला एक नाटक वगैरे द्या. पण बाबांनी असं कधीच नाही केलं. मला प्रकर्षाने या सगळ्या गोष्टी जाणवतात. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता की मला आता माझं माझं करावं लागणार".