मराठी अभिनेत्यानं सत्यशोधक पद्धतीनं केलं लग्न, आदर्श विवाह सोहळ्याची होतेय चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:00 IST2026-01-29T11:59:48+5:302026-01-29T12:00:40+5:30
मराठी अभिनेता आणि अभिनेत्रीनं 'सत्यशोधक' पद्धतीने लग्न करत नवा आदर्श घालून दिला आहे. चाहत्यांनी या जोडीला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

मराठी अभिनेत्यानं सत्यशोधक पद्धतीनं केलं लग्न, आदर्श विवाह सोहळ्याची होतेय चर्चा!
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता कल्पेश समेळ आणि दिग्दर्शिका प्रतीक्षा खासनीस यांनी २४ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत साधेपणाने लग्नगाठ बांधली. पारंपारिक विधींना फाटा देत, या जोडीने 'सत्यशोधक' पद्धतीने विवाह केला असून त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
आपल्या लग्नाच्या या खास दिवशी प्रतीक्षाने राणी रंगाची साडी नेसली होती, तर कल्पेशने पांढरा कुर्ता आणि तिच्या साडीला मॅचिंग असे राणी रंगाचे उपरणं परिधान केले होते. विशेष म्हणजे प्रतीक्षाने अत्यंत कमी मेकअप करून नैसर्गिक सौंदर्याला पसंती दिली होती. निसर्गाच्या सानिध्यात आणि कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कल्पेश आणि प्रतीक्षा यांनी त्यांच्या विवाहासाठी कोणतंही अलिशान हॉल किंवा रिसॉर्ट न निवडता, त्यांच्या हक्काच्या कामाच्या जागेवर म्हणजेच 'Earthian' येथे लग्न केले. कल्पेशने भावूक पोस्ट शेअर याबद्दल सांगितलं. कल्पेश आणि प्रतीक्षाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ऋतुजा बागवे हिच्यासह अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.
'सत्यशोधक विवाह' म्हणजे काय?
'सत्यशोधक विवाह' हे समाजात समतेचा, विज्ञाननिष्ठ विचाराचा आणि परिवर्तनाचा एक आदर्श विवाह म्हणून समोर येत आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी १९ व्या शतकात या सत्यशोधक विवाह पद्धतीची सुरुवात केली. अंधश्रद्धा, जातिभेद आणि अवास्तव खर्च टाळणारी ही विवाहपद्धत, समाजसुधारणेच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. सत्यशोधक विवाहातून कोणताही धार्मिक विधी, मंत्रपठण, ब्राह्मण वर्चस्व किंवा हुंडा नसतो. वधू-वर एकमेकांच्या समोर उभे राहून, प्रेम, सहजीवन, जबाबदारी आणि महात्मा जोतिराव फुले यांनी तयार केलेल्या समतेच्या मंगलाष्टक म्हणतात.