'झिम्मा २' सुपरहिट! बॉलिवूड सिनेमांवर पडतोय भारी, दोन आठवड्यांत कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 15:58 IST2023-12-09T15:58:26+5:302023-12-09T15:58:48+5:30
'झिम्मा २' या मराठी सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मोठे बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले तरी 'झिम्मा २'ची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये.

'झिम्मा २' सुपरहिट! बॉलिवूड सिनेमांवर पडतोय भारी, दोन आठवड्यांत कमावले 'इतके' कोटी
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या मराठी सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. पहिल्या भागाप्रमाणेच 'झिम्मा २'वरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. या सिनेमाच्या शोला चित्रपटगृहात हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली आहे. खासकरुन महिला प्रेक्षकवर्ग हा सिनेमा बघण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहे.
सात बायकांचा 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच ठाण मांडून बसला आहे. 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांनाही तगडी टक्कर देत आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात या सिनेमाने ७.३८ कोटींचा गल्ला जमवला होता. आता दुसऱ्या आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'झिम्मा २'ने तिसऱ्या आठवड्यात दमदार पदार्पण केलं आहे. मोठे बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले तरी 'झिम्मा २'ची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या सिनेमाने दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर १०.६२ कोटींचा गल्ला जमवला आहे. हेमंत ढोमेने इन्स्टावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. "प्रेक्षकांचा प्रतिसाद भाराऊन टाकणारा आहे, आपला 'झिम्मा २' प्रचंड गाजतोय, तो केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमामुळे…तिसरा आठवडा सुरू झालाय…पिक्चर अभी बाकी है…", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'झिम्मा २'मध्ये सुहास जोशी, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, रिंकू राजगुरू या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.