मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:10 IST2025-11-08T11:09:58+5:302025-11-08T11:10:25+5:30
मुलगा स्वामींचा भक्त आहे हे कळलं तेव्हा..., जयवंत वाडकर यांची प्रतिक्रिया

मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
मराठीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीचा काल साखरपुडा संपन्न झाला. स्वामिनीचा होणारा नवरा वरुण नायर हा मल्याळी आहे. स्वामिनी आणि वरुण काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघंही मीडिया क्षेत्रातच काम करतात. वरुण एका मीडिया कंपनीत काम करतो. निर्माता, प्रोडक्शन इनचार्ज आहे. दरम्यान वरुण स्वामी भक्त आहे असाही खुलासा जयवंत वाडकर यांनी केला.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत जयवंत वाडकर म्हणाले, "खूप छान भावना आहेत. मुलगी जातीये ही भावना आहेच. पण लग्न अजून एक-दीड वर्षांनी करायचं असं त्यांनी ठरवलंय. म्हणून आम्ही आधी साखरपुडा करुन घ्या म्हटलं. सगळं अचानक ठरलं. मुलगा छान आहे. मीडिया क्षेत्रातलाच आहे."
ते पुढे म्हणाले, "विशेष म्हणजे मुलगा स्वामींचा भक्त आहे. महिन्यातून एकदा तरी मित्रांसोबत तो स्वामींच्या मठात जातो. परवा माझ्याकडे स्वामींच्या पादुका आल्या होत्या तेव्हा मी त्याची स्वामीभक्ती पाहिली. मला खूप छान वाटलं. एकदा मी रात्री शूटिंगवरुन आलो तेव्हा माझी पत्नी आणि लेक दोघी म्हणाल्या की आम्हाला काहीतरी बोलायचं आहे. म्हटलं, 'हो, बोला ना'. तेव्हाच मला थोडी शंका आली होती. मला आधीपासून थोडं थोडं माहित होतंच. कुणकुण होती. मग त्यांनी मला सांगितल्यावर मी म्हटलं काही हरकत नाही. आपण आपल्या मुलीच्या पाठीशी कायमच आहोत."
जयवंत वाडकर यांची पत्नी म्हणाली, "वरुण मल्याळी आहे. नॉन महाराष्ट्रीय आहे. पण तो स्वामी भक्त आहे हे मला कळलं तेव्हा मी खूप खूश झाले. स्वामींनीच माझ्या स्वामिनीला अनुकूल जोडीदार शोधून दिलाय असं मला वाटलं. त्यामुळे मी माझ्या लेकीसाठी खूप खूश आहे."