"मला लोकाश्रय मिळाला पण राजाश्रय नाही...", 'धडाकेबाज' फेम अभिनेता दीपक शिर्केंनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:07 IST2025-10-08T17:04:30+5:302025-10-08T17:07:42+5:30
Deepak Shirke : विविध मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये धडाकेबाज खलनायकी भूमिका साकारून दिपक शिर्के यांनी अपार लोकप्रियता मिळवली. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.

"मला लोकाश्रय मिळाला पण राजाश्रय नाही...", 'धडाकेबाज' फेम अभिनेता दीपक शिर्केंनी व्यक्त केली खंत
सिनेइंडस्ट्रीच्या इतिहासात असे काही कलाकार आहेत, ज्यांनी खलनायकी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या कलाकारांच्या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. अशा कलाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे दिपक शिर्के (Deepak Shirke). अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, त्यांनी केवळ आपली मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान मिळवलं. 'थरथराट', 'दे दणादण' यांसारख्या मराठी चित्रपटांसह 'एक गाडी बाकी अनाडी', 'अग्निपथ', 'तिरंगा' अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. विविध मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये धडाकेबाज खलनायकी भूमिका साकारून दिपक शिर्के यांनी अपार लोकप्रियता मिळवली. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.
दिपक शिर्के यांनी नुकतीच मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. ते म्हणाले की, "लोकाश्रय मला खूप मिळाला पण राजाश्रय मिळाला नाही. आता आता असं वाटायला लागलंय. तेव्हा लोकाश्रय बरा वाटायचा. माझ्यामागचे लोक पद्मश्री घेऊन गेली, पण आम्ही इतकं करुन आम्हाला काहीच मिळालं नाही. आता मी आणि बायको आहे. आहोत. ६०-६५ वर्षांचा एक भाऊ आहे. वय झालंय, पुढे काय हेच कळत नाही."
"ही व्यवस्थेची चूक नाही, माझं दुर्दैव आहे."
"ही व्यवस्थेची चूक नाही, माझं दुर्दैव आहे. त्यांना काय दोष द्यायचा. काय करायला हवं याचं उत्तर नाही माझ्याकडे. पण जर पद्मश्री मिळाला तर किमान ५० पोलीस तरी अंत्यसंस्काराला येतील," अशी खंत ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के यांनी सौमित्र पोटे यांच्या मुलाखतीत व्यक्त केली.