"मरेपर्यंत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही", लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी वर्षा उसगावकर यांनी सांगितली 'ती' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:43 IST2025-07-14T16:43:01+5:302025-07-14T16:43:29+5:30
Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांनी अलिकडेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातली एक इच्छा सांगितली, जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

"मरेपर्यंत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही", लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी वर्षा उसगावकर यांनी सांगितली 'ती' गोष्ट
वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारी या अभिनेत्यांचा समावेश आहे. अलिकडेच वर्षा उसगावकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातली एक इच्छा सांगितली, जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही.
वर्षा उसगावकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातली आतापर्यंत न माहित असलेली खंत सांगितली. त्यांनी सांगितले की, "आज लक्ष्या असता तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता असे मला वाटते. त्याचे अकाली निधन झाले असे मी म्हणेन. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मी 'एक होता विदूषक' हा चित्रपट केला होता. त्याआधी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे कॉमेडी, कॉमेडी आणि फक्त कॉमेडी असे समजले जायचे. लक्ष्याला तीच खंत होती की माझा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना दिसला पाहिजे. जेव्हा दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी लक्ष्मीकांतला हा चित्रपट दिला, तेव्हा त्याने लगेच मला फोन केला. तो म्हणाला की, या चित्रपटात मला तू हवी आहेस. तू हा चित्रपट कर. कदाचित तुला मानधन कमी देतील. हा चित्रपट स्त्रीप्रधान नसेल, पण तू हा चित्रपट करावा अशी माझी इच्छा आहे."
''त्याला कायम ती खंत वाटत राहिली...''
त्या पुढे म्हणाल्या की, लक्ष्याने ज्या पद्धतीने त्यात काम केलंय, ते मला खूप 'टचिंग' वाटलं. त्याचे सीन नसले तरी तो तिथे हजर असायचा. एक वेगळा लक्ष्या मला तिथे दिसला. त्या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत बेर्डेंना पुरस्कार मिळायलाच हवा होता. मला असं वाटलं की त्याने अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स केला होता. पण त्या वर्षीचा पुरस्कार त्याला मिळाला नाही. त्याला खूप वाईट वाटले. त्याला कायम ती खंत वाटत राहिली की, या चित्रपटासाठी मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होता."
वर्षा उसगावकर यांना आजही वाटते की, तो पुरस्कार लक्ष्मीकांत बेर्डे यांनाच मिळायलाच हवा होता. त्या म्हणाल्या की, "ते जर त्याला मिळाले असते, तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. त्याच्या त्या विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून तो बाहेर आला असता."