माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 09:23 IST2025-11-14T09:19:11+5:302025-11-14T09:23:03+5:30
गिरीजाने अगदी प्रेमाने पण परखड शब्दात तिची काळजी व्यक्त केली आहे.

माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
अभिनेत्री गिरीजा ओक एका मुलाखतीमुळे अचानक व्हायरल झाली. तिचा लूक, तिचं बोलणं, तिचं दिसणं सगळंच लोकांना आवडलं. मराठी प्रेक्षकांना गिरीजा आधीपासूनच माहित आहे पण आता ती संपूर्ण देशाला माहित झाली. 'नॅशनल क्रश' असा तिला टॅग मिळाला. मात्र सोशल मीडियावर गिरीजाचं जसं कौतुक होतंय तसंच तिचे फोटो एआय वापरुन मॉर्फही केले जात आहेत. अश्लील पद्धतीने पसरवले जात आहेत यावर गिरीजाने चिंता व्यक्त केली आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
गिरीजा ओक म्हणते, "सोशल मीडियावर जे काही चालू आहे ते पाहून मला भांबावल्यासारखं होतंय. मला आनंदही खूप होतो. छान कमेंट्स, सुंदर मेसेज येतायेत. भरभरुन प्रेम मिळतंय याबद्दल मी आभारी आहे. माझ्या ओळखीचे नातेवाईक, मित्रमंडळींनी फोटो, मीम्स पाठवले. त्यातले काही खूप क्रिएटिव्ह, मजेशीर आहेत. त्याचबरोबर काही फोटो अश्लीलही आहेत. एआयचा वापर करुन ते एडिट केले आहेत. मी सुद्धा याच काळातली मुलगी आहे. सोशल मिडिया वापरणारी मुलगी आहे. एखादी गोष्ट ट्रेंडिंग असल्यावर अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जातात हे मला माहित आहे. विशेषत: महिलांचे किंवा पुरुषांचेही फोटो एआय वापरुन विकृत केले जातात. बदलले जातात आणि पोस्ट केले जातात. क्लिकबेटसाठी हे सगळं असतं. पण या सगळ्याला काहीच नियम नाही. या गोष्टीची मला भीती वाटते."
ती पुढे म्हणाली, "मला १२ वर्षांचा मुलगा आहे. आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही. पण मोठा झाल्यावर करेल. हे मॉर्फ केलेले फोटो आज उद्या आपल्याला दिसतील पण ते इंटरनेटवर सदैव राहतील. उद्या तो मोठा झाल्यावर त्याने माझा असा फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल याचा विचार करुन मला वाईट वाटत आहे. त्याला माहित असेल की हा फोटो खरा नाही एआय आहे. आत्ताही फोटो बघणाऱ्यांना हे माहित आहे. पण तरीही तो फोटो बघताना एक चीप प्रकारची मजा येते. या सगळ्या गोष्टीचा विचार करुन मला हे सांगावंसं वाटलं. मला माहितीये हे सांगितल्यानंतरही काहीच बदल होणार नाहीये. पण काहीच न करणंही मला उचित वाटलं नव्हतं. म्हणून मी ही विनंती करते की अशा प्रकारचे फोटो एडिट करणाऱ्या लोकांनी जरा विचार करुन बघा. तसंच असे पोस्ट लाईक करणाऱ्यांनीही जरा गांभीर्य बाळगा. याव्यतिरिक्त माझी इतर कामं, मराठी नाटक जर बघितले तर मला आनंद होईल. यानिमित्ताने माझ्या कामाबद्दलही लोकांनाही कळतंय याचा मला आनंदच आहे. असंच प्रेम असू द्या मीही असंच छान काम करत राहील."