सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:56 IST2025-11-13T11:55:35+5:302025-11-13T11:56:39+5:30
या ट्रेंडवर गिरीजाने दिली प्रतिक्रिया

सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
गिरीजा ओक मराठीतील जुनी अभिनेत्री आहे. मात्र अचानक ती 'नॅशनल क्रश','व्हायरल गर्ल' म्हणून ओळखली जात आहे. 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीतील तिचा लूक व्हायरल झाला. सोशल मीडियावर ती अचानक व्हायरल झाली. निळ्या साडीत दिसणारी ही अभिनेत्री कोण असं हिंदीतील लोक विचारु लागले. तेव्हा ही तर आमची गिरीजा आहे असं मराठी लोकांनी अभिमानाने उत्तर दिलं. सोशल मीडियावर आलेला हा ट्रेंड पाहून गिरिजा ओकने प्रतिक्रिया दिली आहे.
टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, गिरीजा ओक म्हणाली, "मला हे खूपच भन्नाट वाटतंय. रविवारी संध्याकाळी मी नाटकाच्या तालमीला असताना मला अनेक फोन आले. मी नंतर बघितले. माझ्या मित्रपरिवाराने मला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मेसेज, फोटो पाठवले. ट्विटरवर काय चाललंय बघितलं का? असं मला सगळे विचारत होते. सोशल मीडियावर लोक चर्चा करत आहेत की ही कोण आहे? कोणी सेक्सी म्हटलं आहे. तर माझे मराठी चाहते त्यांना उत्तरं देत आहेत की तुम्ही आत्ता पाहिलंत? आम्ही हिला अनेक वर्षांपासून ओळखतोय."
गिरीजा पुढे म्हणाली, "खरं सांगायचं तर हा फक्त एक ट्रेंड आहे जो येतो आणि जातो. पण माझं जे काम आहे ते कायम राहणार आहे. यावरुन जर लोकांना माझ्या कामाबद्दलही समजत असेल तर मला आनंदच होईल."
गिरीजा ओक सध्या नाटक, हिंदी सिनेमे, सीरिजमध्ये झळकत आहे. तसंच ती अनेक जाहिरातींमध्येही दिसते. शाहरुख खान, आमिर खानसोबत तिने काम केलं आहे.