Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार

By तेजल गावडे. | Updated: April 19, 2025 16:43 IST2025-04-19T16:43:20+5:302025-04-19T16:43:49+5:30

Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Exclusive: The cast of 'Sant Dnyaneshwaranchi Muktai' talk about the saint tradition, roles and directors | Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार

Exclusive : संत पंरपरा, भूमिका अन् दिग्दर्शकांबद्दल सांगतायेत 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'मधील कलाकार

दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित-दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' ( Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie) हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. या चित्रपटात संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे (Tejas Barve) दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक (Neha Naik) हिने साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांशी साधलेला संवाद...

- तेजल गावडे

या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?
नेहा नाईक -
खरेतर माझा त्या दिवशी नाटकाचा प्रयोग होता आणि मी प्रयोग संपवून घरी निघाले होते. मला दिग्पाल दादाच्या ऑफिसमधून फोन आला. त्यांनी माझ्या नाटकाचे पोस्टर पाहिले होते. त्यावरील ही मुलगी कोण आहे, असा प्रश्न पडला होता आणि योगायोगाने तिथे माझा एक मित्र बसला होता. त्याने पटकन माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला. त्याच दिवशी माझ्या आईचा वाढदिवस होता. मी घाई गडबडीत घरी चालले होते. तेवढ्यात फोन आला. मी तिथे गेले आणि गेल्यानंतर त्यांनी मला वाचायला दिले. अक्षरशः १० मिनिटात माझी मुक्ताईंच्या भूमिकेसाठी निवड झाली. मला विश्वासच बसत नव्हता. २-३ दिवसांनी आमचे वाचन होणार होते. तेव्हाही माझी ऑडिशन होईल असे मला वाटले पण याउलट दादाने सगळ्यांना ही आपली मुक्ताई अशी ओळख करून दिली. त्यामुळे माझ्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट आहे.

तेजस बर्वे - यापूर्वी मी दादासोबत सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. या चित्रपटाच्या आधी दादाने मालिका केली होती. त्यासाठीही मला विचारले होते पण त्यावेळी काही कारणामुळे ते शक्य होऊ शकलं नाही. पण कुठेतरी माऊलींनी ही व्यक्तिरेखा माझ्यापर्यंत पोहोचवली. यावेळी सगळे जुळून आले आणि ही संधी उपलब्ध झाली. सिनेमाच्या निमित्ताने या कुटुंबासोबत परत एकदा काम करण्याची संधी मिळाली आणि तेजस म्हणून माझा अध्यात्मिक दृष्टिकोन खूप बदलला. 

या चित्रपटाबद्दल काय सांगाल?
अजय पूरकर -
ज्ञानेश्वर माऊली मालिकेत मी विसोबा शास्त्रीजींची भूमिता केली होती. तेव्हापासूनच दिग्पालला मी चांगदेवांची भूमिका साकारावी अशी इच्छा होती. पण जेव्हा त्याचा मोठा फॉरमॅट करू तेव्हा ही भूमिका करायची असे ठरले होते आणि आता मी ही भूमिका करतो आहे. हा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा सिनेमा आहे. कारण २०२५ मध्ये असा चित्रपट करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. महाराष्ट्राची संत परंपराही तेवढीच मोठी आहे. शिव अष्टकांसोबत दिग्पालला संत पंचक करायचे आहे. त्यातलं पहिलं ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र भेटीला येत आहे. खूप वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांवर ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा आला होता. त्यानंतर ८४ वर्षांनी हा सिनेमा येतोय. तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीने काही प्रयोग झाले असले तरी मुक्ताईंच्या दृष्टीकोनातून आतापर्यंत कोणती कलाकृती आलेली नाही. त्यामुळेही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. 

दिग्पाल लांजेकर यांच्याबद्दल काय सांगशील?
स्मिता शेवाळे -
दिग्पालसोबत मी सुभेदार सिनेमा आणि ज्ञानेश्वर माऊली मालिकेत रुक्मिणीची भूमिका केली होती. त्यानंतर आता माझा हा तिसरा प्रोजेक्ट आहे. दिग्पालसारखा अभ्यासू, ध्यास असलेला दिग्दर्शक आताच्या पिढीमध्ये मिळणे कठीण आहे. आम्हाला त्याच्यासोबत काम करता आलं त्यासाठी आम्ही नशीबवान आहोत. त्याच्यासोबत काम करताना कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला खूप कस लागतो आणि शिकायला मिळते. 

चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगाल?
गायक व संगीत दिग्दर्शक, अवधूत गांधी -
संप्रदाय आणि परंपरा अनेक वर्ष प्रवचनकार आणि किर्तनकांराच्या माध्यमातून पोहचत राहिलेले आहे. काळाच्या ओघात मराठी संस्कार आणि परंपरा कुठेतरी मागे पडत आहे. ते जपण्याची गरज आहे, त्यासाठी हा अट्टाहास केला आहे.

Web Title: Exclusive: The cast of 'Sant Dnyaneshwaranchi Muktai' talk about the saint tradition, roles and directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.