Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3'
By तेजल गावडे | Updated: October 8, 2018 13:24 IST2018-10-08T13:22:27+5:302018-10-08T13:24:31+5:30
आता 'बॉईज 2' चित्रपटानंतर 'बॉईज 3' बनणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे

Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3'
तीन शालेय मित्रांचे विश्व मांडणारा 'बॉईज' हा मराठी चित्रपट 2017 साली रसिकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील 'आम्ही लग्नाळू गाणं...' व चित्रपट अक्षरशः रसिकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आणि नुकताच 'बॉईज'चा सीक्वल चित्रपटगृहात दाखल झाला. पहिल्या भागाप्रमाणेच 'बॉईज 2'ला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यानंतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा तिसरा भाग देखील बनवण्यात येणार आहे.
'बॉईज' चित्रपटात गावातून आलेले धैर्या व ढुंग्या शालेय शिक्षणासाठी बोर्डींगमध्ये येतात आणि तिथे त्यांची कबीरसोबत मैत्री होते. त्यानंतर ते बोर्डींगमध्ये करामती करतात आणि अखेर प्रेक्षकांना चांगला संदेशही देताना दिसतात. या चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व दाखवण्यात आले आहे. प्रेम आणि रोमान्स चित्रपटात पाहायला मिळाला तरी आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाद देखील पाहायला मिळतो आहे. 'बॉईज 2' या चित्रपटात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतीक लाड, जयंत वाडकर, गिरीश कुलकर्णी, सायली पाटील यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शन केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. ॠषिकेश कोळी कथा, पटकथा व संवाद लेखन तर जटला सिद्धार्थ यांनी छायादिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अवधुत गुप्तेच्या संगीताने चित्रपटात रंगत आणली आहे.
आता 'बॉईज 2' चित्रपटानंतर 'बॉईज 3' देखील येणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 'बॉईज 3'चे कथानक वेगळे असणार असून यावेळेस तरूणींवर आधारीत कथानक असल्याचे समजते आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.