‘हर हर महादेव’च्या वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी सोडले मौन, म्हणाले - 'आम्ही कोणताही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 13:01 IST2022-11-08T13:00:24+5:302022-11-08T13:01:06+5:30

Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. दरम्यान आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आहे.

Director Abhijit Deshpande broke silence on the controversy of 'Har Har Mahadev', said - 'We are any...' | ‘हर हर महादेव’च्या वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी सोडले मौन, म्हणाले - 'आम्ही कोणताही...'

‘हर हर महादेव’च्या वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी सोडले मौन, म्हणाले - 'आम्ही कोणताही...'

हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राज्यात काही ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. दरम्यान आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे (Abhijeet Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली आहे.

हर हर महादेवचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे म्हणाले की, आम्ही कोणताही चुकीचा इतिहास सिनेमात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डकडून सर्टिफिकेट मिळाले आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्ताऐवज आम्ही सेन्सॉर बोर्डकडे पुरविले आहेत. त्यानंतरच या सिनेमाला हिरवा कंदिल देण्यात आला. कोणत्याही सिनेमाला अशीच मान्यता मिळत नाही. ऐतिहासिक सिनेमासंदर्भात सेन्सॉर बोर्डच्या पॅनेलवर इतिहासकारही असतात. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे हे चुकीचे आहे.


ठाण्यात विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हर हर महादेव सिनेमाचा शो बंद करण्यात आला होता. यावरही अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत आपले मत मांडले. ते म्हणाले की, चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडे फाडले गेले. अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. हा घडलेला प्रकार अत्यंत लांच्छनास्पद आहे. एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वत:ला भक्त म्हणवतो. तर दुसरीकडे त्यांचेच विचार समजून न घेता शिवीगाळ, मारहाण करत असू तर आपल्याला हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवायचा आहे.

हर हर महादेव सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवर चुकीचा इतिहास दाखवला असल्याचा आक्षेप घेतला जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना अभिजीत देशपांडे म्हणाले, आमच्या टीमकडून याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे. आक्षेप घेतलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, ऐतिहासिक संदर्भ याबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडली जाईल.

हर हर महादेव सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका निभावली आहे तर शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेच्या भूमिकेत आहे. मराठीसह तेलुगु, तमिळ, कन्नड, हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.

Web Title: Director Abhijit Deshpande broke silence on the controversy of 'Har Har Mahadev', said - 'We are any...'