अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:51 IST2025-08-08T17:50:55+5:302025-08-08T17:51:19+5:30
दिलीप प्रभावळकर आणि अतुल परचुरेंनी तीन मराठी नाटकात एकत्र काम केलं होतं.

अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
मराठीतील विनोदी अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जगाचा निरोप घेतला. त्यांना कॅन्सर झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. कामावरही परतले होते. मात्र काही कारणाने त्यांची तब्येत पुन्हा खालावली. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी संपूर्ण कलाविश्वाला चटका लावणारी होती. त्यांच्या अंत्यदर्शनाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सर्वांनी साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला. नुकतंच एका मुलाखतीत अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर यांनी अतुल परचुरेंची आठवण काढली, ते म्हणाले, "अतुल खूप फ्रेंडली, प्रेमळ होता. आम्ही तीन नाटकांमध्ये एकत्र काम केलं. दोन नाटकात तो माझा मुलगा होता. 'वासूची सासू' आणि 'नाती गोती' ही ती दोन नाटकं होती. तसंच तिसरं 'वाह गुरु' नाटकात तो माझा विद्यार्थी होता. आम्ही सतत संपर्कात होतो. एकमेकांसोबत मस्ती मजा करणं चालायचं. आम्ही दादरला जवळच राहायचो. नंतर मी पुण्याला गेलो. पण फोन करुन तो मला तब्येतीचे अपडेट्स द्यायचा. डॉक्टरांनी क्लिअरन्स दिलाय, सगळं ओके आहे इथपर्यंत त्याने सांगितलं होतं. नंतर तो नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेतही जाऊन आला होता. पण नंतर ते पुन्हा सुरु झालं. त्यामुळे मला अतुलची खूप आठवण येते. आमच्या अनेक आवडीनिवडीही सारख्याच होत्या. हिंदी संगीताची आवड सारखी होती. लता मंगेशकरांची गाणी आम्ही ऐकायचो. आमचा चावटपणा, वात्रटपणाही खूप चालायचा. त्याचा दिसायचा, माझा नव्हता दिसत."
"विक्रम गोखलेसोबतही काम करणं आनंददायी अनुभव होता. आप्पा आणि बाप्पा हे नाटक आम्ही केलं होतं. नंतर आम्ही मेसेजवर बोलायचो. मेसेजच्या शेवटी त्यावर आम्ही तुझा बाप्पा, तुझा आप्पा असं लिहायचो. तोही शेवटपर्यंत संपर्कात होता. पण अतुलला मी खूपच मिस करतो. कारण तो बरा झालाय असं म्हणता म्हणता तो गेला."
दिलीप प्रभावळकर ८१ वर्षांचे आहेत. तरी आजही ते प्रत्येक भूमिका ताकदीने निभावत आहेत. लवकरच ते 'दशावतार' या सिनेमात दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबतच महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर यांचीही भूमिका आहे.