"...म्हणून अभंग तुकाराममध्ये महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर नाही", अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण
By कोमल खांबे | Updated: October 19, 2025 17:24 IST2025-10-19T17:24:01+5:302025-10-19T17:24:45+5:30
'अभंग तुकाराम' सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांच्याऐवजी अजिंक्य राऊतला शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवडण्यामागचं नेमकं कारण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितलं.

"...म्हणून अभंग तुकाराममध्ये महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर नाही", अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण
'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकर 'अभंग तुकाराम' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातून संत तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा एक सीनही दाखविण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण आहेत. तर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांच्याऐवजी अजिंक्य राऊतला शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवडण्यामागचं नेमकं कारण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितलं.
दिग्पाल लांजेकर म्हणाले, "चिन्मय मांडलेकर जरी आमच्या टीमसोबत असता तरी तो या चित्रपटात नसता. त्याचं कारण म्हणजे संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट जेव्हा ते छत्रपती झालेले नव्हते तेव्हा झाली होती. तेव्हा ते १७ वर्षांचे होते. त्यामुळे आम्ही कितीही मेकअप केला असता. तरी चिन्मयला १७ वर्षांचं दाखवता आलं नसतं. १७ वर्षांचे शिवाजीराजे संत तुकारामांना भेटले. त्यांना वैराग्य प्राप्त झालं. आणि त्या वैराग्याचा वापर हा जनतेच्या भल्यासाठी कसा करायचा हे तुकारामांनी महाराजांनी सांगितलं. गनिमी कावा कसा करावा, याचे अभंग सुद्धा तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत".
"१७ वर्षांच्या शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणारे तुकोबा दिसायला हवेत. त्यासाठी तरुण दिसणारे शिवाजी महाराज हवे होते. म्हणून अजिंक्य राऊतसारख्या कोवळ्या चेहऱ्याची आम्ही निवड केली. विठु माऊली म्हणून तो घराघरात प्रसिद्ध आहे हेदेखील एक कनेक्शन आहे. त्याशिवाय तो एक उत्तम अभिनेता आहे. तो विशीतला दिसतो. त्यामुळे त्याची निवड केली", असंही दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं.