कोकणच्या 'कांतारा'चा नवा विक्रम! 'दशावतार' सिनेमाने २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:35 IST2025-10-03T13:33:49+5:302025-10-03T13:35:41+5:30
तिसऱ्या आठवड्यातही हाऊसफुल्ल गर्दी! 'दशावतार'ची २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल इतके कोटी. वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

कोकणच्या 'कांतारा'चा नवा विक्रम! 'दशावतार' सिनेमाने २१ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी
सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' (Dashavatar) या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे येण्यासाठी आकर्षित करत आहे. 'दशावतार' रिलीज होऊन २१ दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये 'दशावतार'ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. 'कोकणचा कांतारा' अशी ओळख असलेल्या 'दशावतार' सिनेमाची कमाई जाणून थक्कच व्हाल
'दशावतार'ने तीन आठवड्यात किती कमाई केली?
'दशावतार' चित्रपट प्रदर्शित होऊन २१ दिवस झाले असून, सैकनिल्कने दिलेल्या अहवालानुसार २० व्या दिवसापर्यंतची कमाई २१.७५ कोटींहून अधिक झाली आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत 'दशावतार'ने या वर्षाचा अर्थात २०२५ चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होण्याचा मान मिळवला आहे. तिसऱ्या आठवड्यात 'दशावतार'समोर 'कांतारा चाप्टर १' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या बिग बजेट सिनेमांचं आव्हान आहे.
एकूणच 'दशावतार' चित्रपटाची कमाई पहिल्या दोन आठवड्यांपेक्षा तिसऱ्या आठवड्यात कमी झाली असली तरी, 'दशावतार'च्या कमाईचा आकडा वाढत आहे, ही मराठी प्रेक्षकांसाठी आणि 'दशावतार'च्या टीमसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली 'बाबुली मेस्त्री' ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या दमदार अभिनयामुळे या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला चांगली 'वर्ड ऑफ माऊथ' पब्लिसिटीचा फायदा मिळत आहे. कोकणातील संस्कृती आणि गूढ कथेची जोड यामुळे प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. 'दशावतार' हा चित्रपट मराठी सिनेमासाठी गेम-चेंजर ठरत आहे. आता येणाऱ्या दिवसात 'दशावतार' आणखी किती कमाई करणार, हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे.