... आणि लक्ष्या सर्वांना घेऊन पडला पाण्यात; महेश कोठारेंनी सांगितलेला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 09:56 AM2024-02-04T09:56:11+5:302024-02-04T09:56:39+5:30

तो शॅाट घेण्यासाठी मी कोल्हापूरला सेट लावला होता. तिथे गुहा बनवण्यात आली होती.

...and Lakshya fell into the water with them all; Narrated by Mahesh Kothare | ... आणि लक्ष्या सर्वांना घेऊन पडला पाण्यात; महेश कोठारेंनी सांगितलेला किस्सा

... आणि लक्ष्या सर्वांना घेऊन पडला पाण्यात; महेश कोठारेंनी सांगितलेला किस्सा

महेश कोठारे

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आमच्या सर्वांच्या लाडक्या लक्ष्यासोबत मी खूप काम केलं असल्याने त्याचे आणि माझे भरपूर धमाल किस्से आहेत. त्या सर्वांमध्ये १९९० मध्ये रिलीज झालेल्या ‘धडाकेबाज’ चित्रपटाच्या वेळी घडलेला किस्सा फारच धमाल आहे. या चित्रपटाने तिकीटबारीवर धमाल केलीच, पण प्रेक्षकांचा कौलही मिळवला. यातील लक्ष्याचा डबल रोल आणि बाटलीतील गंगाराम प्रेक्षकांना खूप भावला. ‘धडाकेबाज’मध्ये लक्ष्या गुहेत पडतो आणि तिथे त्याची भेट बाटलीतील गंगारामशी होते, असा सीन चित्रपटात आहे. मंदिर परिसरात असलेल्या गुहेचा दरवाजा उघडतो आणि घसरगुंडीवरून लक्ष्या खाली जातो. त्या घसरगुंडीतून पाणी वाहत असतं. त्यातून घसरत तो खाली येतो आणि आपटतो असा सीन होता.

तो शॅाट घेण्यासाठी मी कोल्हापूरला सेट लावला होता. तिथे गुहा बनवण्यात आली होती. त्यात दगडी वाटणारी घसरगुंडीही तयार केली होती. कला दिग्दर्शक शरद पोळ यांनी छान सेट तयार केला होता. गुहेतील घसरगुंडीवर पाण्याचीही व्यवस्था केली होती आणि आम्ही सर्वजण हॉलिवूड स्टाइलमध्ये हाफ पँट घालून शूटिंग करत होतो. गुहेत दोन कॅमेरा सेट अप लावला होता. दोन कॅमेरे दोन बाजूंनी लक्ष्याच्या हालचाली टिपणार होते. तुला वरून घसरत खाली यायचं आहे, असं मी लक्ष्याला सांगितलं होतं. लक्ष्या वर होता आणि गोल फिरून येणाऱ्या घसरगुंडी संपते तिथे आम्ही खाली उभे होतो. त्या शॅाटमध्ये लक्ष्याने जीन्स घातली होती, जी खूप रफ होती. जीन्स घालूनच लक्ष्याला घसरत खाली यायचं होतं, पण काही केल्या जीन्स पुढे घसरतच नव्हती. स्लोप असूनही घसरगुंडीवरून लक्ष्याला घसरता येत नव्हतं.

मी लक्ष्याला म्हटलं की, काय हे... शॉट रेडी आहे आणि तू पुढे सरकत नाहीस... तो म्हणाला की, अरे मी काय करू? पँटमुळे मला घसरता येत नाही... त्यामुळे काय करायचं, असा आम्हाला प्रश्न पडला होता. या प्रश्नाचं उत्तरही लक्ष्यानेच दिलं. तो म्हणाला की, महेश एक काम कर. एक साबण मागव, 
जो मी माझ्या मागच्या बाजूला लावतो. त्यानंतर घसरणं सोपं होईल. त्याची आयडिया मला आवडली. मी लगेच साबण मागवला आणि लक्ष्याला दिला. लक्ष्या साबण लावून तयार झाला. शॅाट घेण्यासाठी आम्ही रेडी होतो. कॅमेऱ्यावर डीओपी सूर्यकांत लवंदे होते. स्टार्ट साउंड, कॅमेरा आणि ॲक्शन म्हणताच लक्ष्याने हात सोडल्यावर तो जो काही घसरत वेगात खाली आला, तो आम्हा सर्वांना घेऊनच पुढे गेला. खाली पाणी होतं. आम्ही कॅमेऱ्यासकट त्या पाण्यात पडलो. कॅमेरा अटेंडंटने कॅमेरा सांभाळल्याने नुकसान झालं नाही. पाणी असल्याने कोणाला दुखापतही झाली नाही... पण लक्ष्यासोबतचा हा धमाल किस्सा मी कधीही विसरणार नाही.

Web Title: ...and Lakshya fell into the water with them all; Narrated by Mahesh Kothare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.