बर्थडे सरप्राईज! लाडक्या अमृतासाठी प्राजक्ता माळीने पाठवलं 'हे' स्पेशल गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:36 IST2025-11-21T10:35:51+5:302025-11-21T10:36:20+5:30
प्राजक्ताने अमृताला तिच्या वाढदिवसाच्या आधीच गिफ्ट पाठवलं आहे.

बर्थडे सरप्राईज! लाडक्या अमृतासाठी प्राजक्ता माळीने पाठवलं 'हे' स्पेशल गिफ्ट
मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची 'चंद्रमुखी' अर्थात अमृता खानविलकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी. या दोघींमध्ये अत्यंत घट्ट मैत्री आहे. ही मैत्री फक्त इव्हेंट्सपुरती मर्यादित नसून, ती कामाच्या पलीकडेही खूप घट्ट आहे, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. आता पुन्हा एकदा या मैत्रीचा एक गोड आणि खास क्षण समोर आला आहे. येत्या २३ नोव्हेंबरला लाडक्या अमृता खानविलकरचा वाढदिवस असतो. वाढदिवसाला अवघे दोनच दिवस बाकी असताना, प्राजक्ता माळीने मात्र आपल्या मैत्रिणीला एक मोठं सरप्राईज दिलं आहे.
प्राजक्ताने अमृताला तिच्या वाढदिवसाच्या आधीच गिफ्ट पाठवलं आहे. प्राजक्ताने पाठवलेलं हे गिफ्ट खूपच खास आहे. प्राजक्ताने तिच्या स्वतःच्या 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रँडचे सुंदर दागिने अमृताला भेट म्हणून दिले आहेत. प्राजक्तराज ब्रँड हा पारंपरिक आणि अस्सल मराठमोळ्या दागिन्यांसाठी ओळखला जातो. बर्थडे गिफ्ट मिळताच अमृता प्रचंड आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं.
अमृताने सोशल मीडियावर या खास गिफ्टची झलक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवली. तसेच आपली भावना व्यक्त केल्यात. अमृता म्हणाली, "माझं Early बर्थडे गिफ्ट... हे पाठवलंय माझ्या लाडक्या प्राजूने... थँक्यू सो मच डार्लिंग! आय लव्ह यू... खूप प्रेम राणी!".
प्राजक्ता आणि अमृता या दोघींची मैत्री गेली अनेक वर्षे टिकून आहे. दोघी एकमेकींना नेहमीच सपोर्ट करताना दिसतात आणि एकमेकींच्या कामाचं कौतुक, यश सेलिब्रेट करतात. यंदाच्या वर्षी या दोघी एकत्र केदारनाथ यात्रेला सुद्धा गेल्या होत्या. अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द ताज स्टोरी' या सिनेमात झळकली होती. तर प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाची निवेदिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.