"माझ्या अपघाताची बातमी पसरली...", अजिंक्य देव यांनी व्हिडिओ शेअर करत दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:09 IST2025-10-17T13:08:39+5:302025-10-17T13:09:58+5:30
नुकतंच अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.

"माझ्या अपघाताची बातमी पसरली...", अजिंक्य देव यांनी व्हिडिओ शेअर करत दिलं स्पष्टीकरण
मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेते अजिंक्य देव चर्चेत आहेत. लवकरच ते रणबीर कपूरच्या 'रामायण'सिनेमात दिसणार आहेत. गेल्या वर्षी ते मराठीतील गाजलेल्या 'घरत गणपती' या सिनेमातही दिसले. दरम्यान अजिंक्य देव यांच्या अपघाताची बातमी काही दिवसांपूर्वी पसरली. यावरुन त्यांना अनेक फोनही आले. नुकतंच अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणतात, "नमस्कार मी अजिंक्य देव. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. माझ्या गाडीचा अपघात झाला वगैरे. सगळं खोटं आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे. आईवडिलांचा आशीर्वाद आहे. पण का कोण जाणे लोक अशा या बातम्या पसरवतात. कदाचित त्यांना प्रसिद्धी हवी असेल. असो, मी ठीक आहे. असंच प्रेम करत राहा. मला अनेक फोन आले. चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील माणसं माझ्यावर, माझ्या कुटुंबावर इतकं प्रेम करतात हे पाहून खूप बरं वाटलं. माझ्यावर प्रेम करण्यासाठी खूप खूप आभार. असाच आशीर्वाद राहू द्या. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा."
अजिंक्य देव हे मराठी, हिंदीतील सुपरस्टार रमेश देव यांचे धाकटे चिरंजीव आहेत. अजिंक्य देव यांनी 'सर्जा', 'कशासाठी प्रेमासाठी', 'माहेरची साडी' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या ते पुन्हा मराठी, हिंदी सिनेसृष्टीत सक्रीय झाले आहेत.