'ऑपरेशन सिंदूर'नंतर श्रेयस तळपदेनं जवानांसाठी केली प्रार्थना, म्हणाला - "त्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:30 IST2025-05-09T11:29:41+5:302025-05-09T11:30:41+5:30
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर जवानांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर श्रेयस तळपदेनं जवानांसाठी केली प्रार्थना, म्हणाला - "त्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो.."
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पहलगाम हल्लाविरोधात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर पाकिस्ताननं गुरुवारी रात्री भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भारतासोबत युद्ध छेडले. मात्र, भारतीय लष्करानं पाकिस्तानचं कोणताही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही आणि रात्रीपासूनच भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. या सर्व घडामोडीदरम्यान सर्व स्तरातून जवानांचं कौतुक होत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)नेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जवानांसाठी प्रार्थना केली आहे.
श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहिले की, आजही नेहमीप्रमाणे मी आपल्यासाठी लढणाऱ्या शूर वीरांसाठी प्रार्थना करतो. ज्यांच्यामुळे आपण रात्री शांतपणे झोपू शकतो, नेहमीप्रमाणे कामावर जाऊ शकतो आणि आपल्या कुटुंबांसोबत राहू शकतो. माझ्या देशातील सर्व प्रभावित लोकांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आपले सैन्य, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत आणि आमच्या प्रार्थनेद्वारे तुम्हाला शक्ती पाठवत आहोत. जय हिंद. अभिनेत्याच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
वर्कफ्रंट
श्रेयस तळपदेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्थान मिळवले आहे. सध्या तो 'झी मराठी'च्या 'चल भावा सिटीत' या नव्याकोऱ्या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. या शोमध्ये तो सूत्रसंचालकाची भूमिका पार पडतो आहे. याशिवाय श्रेयस हॉरर कॉमेडी असलेल्या 'कपकपी' या चित्रपटात दिसणार आहे.