'दशावतार'नंतर सिद्धार्थ मेननचा नवीन सिनेमा 'मना'चे श्लोक, अभिनेता पहिल्यांदाच बनला गायक, गाणं व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:41 IST2025-09-24T13:40:52+5:302025-09-24T13:41:23+5:30

Siddharth Menon New Movie: मृण्मयी देशपांडेने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातील सिद्धार्थ मेननने गायलेल्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे

after dashavtar marathi movie siddharth menon new movie manache shlok song viral | 'दशावतार'नंतर सिद्धार्थ मेननचा नवीन सिनेमा 'मना'चे श्लोक, अभिनेता पहिल्यांदाच बनला गायक, गाणं व्हायरल

'दशावतार'नंतर सिद्धार्थ मेननचा नवीन सिनेमा 'मना'चे श्लोक, अभिनेता पहिल्यांदाच बनला गायक, गाणं व्हायरल

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातील ‘तू बोल ना’ गाण्याला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरं गाणं ‘हैय्या हो’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  सिद्धार्थ सौमिल यांचे कमाल संगीत लाभलेल्या या गाण्याला  प्राजक्त देशमुख यांचे शब्द लाभले आहेत. 'हैय्या हो'मधील  सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि सुव्रत जोशी यांचा जबरदस्त लूक सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे यात तिघांनी अभिनयासोबत पहिल्यांदाच गायनही केले आहे. त्यामुळे अभिनयाबरोबरच त्यांची ही नवीन बाजूही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तिघांचा  पेहराव पाहून त्यांच्या नेमक्या व्यक्तिरेखा काय आहेत, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, त्यांच्या भूमिकेबाबत तिघांनी गोपनीयता ठेवली असली तरी गाण्याचा अनुभव मात्र त्यांनी शेअर केला आहे. 

सिद्धार्थ मेनन म्हणतो, " हे गाणं इतकं एनर्जेटिक आणि उत्साही आहे की, आम्हाला तिघांना हे गाणं गाताना फार मजा आली. गाण्याची ऊर्जा आणि उत्साह  प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, याचा आनंद होतो." हरीश दुधाडे म्हणतो, " गायक म्हणून ही आमच्या तिघांसाठी ही एक नवी सफर खूप मजेशीर होती. 'हैय्या हो' हे गाणं प्रेक्षकांच्या आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन आणेल." सुव्रत जोशी म्हणतो, "अभिनयासोबत गाणं गाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आणि तो खूप धमाल ठरला. ‘हैय्या हो’ गाताना आम्ही जितकी मजा केली, तितकीच मजा प्रेक्षकांनाही मिळेल."

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणते, " सिद्धार्थ, हरीश आणि सुव्रत हे तिघेही उत्तम अभिनेते आहेत. ‘हैय्या हो’ गाण्यात त्यांनी गायक म्हणून जे काही केलं आहे ते खरंच अप्रतिम आहे. या गाण्यातून त्यांनी दाखवलेला उत्साह, मजा आणि सकारात्मकता प्रेक्षकांच्या मनात नक्की पोहोचेल. अभिनयाबरोबरच त्यांच्या या नव्या बाजूचा अनुभव प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे. हे गाणं चित्रपटात खूप महत्वाची भूमिका बजावते. आता ती कशाप्रकारे हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल.'' 

या गाण्यानंतर या चित्रपटाने स्वतःचे वेगळपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे यात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, अशी चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये सुरु झाली आहे. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Web Title: after dashavtar marathi movie siddharth menon new movie manache shlok song viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.