मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:51 IST2025-10-03T13:50:37+5:302025-10-03T13:51:37+5:30
मराठी इंडस्ट्रीतल्या दोन गोष्टी मला खूप आवडतात, त्या म्हणजे...निकिता दत्ताची प्रतिक्रिया

मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
गेल्या काही वर्षात मराठीतील गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'घरत गणपती'. या सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. मराठी कुटुंबाचा कोकणातील गणेशोत्सव, रुढी, परंपरा, भांडणं आणि कुटुंबातील मुलाला आवडणारी अमराठी मुलगी हे सगळं कसं शिकते याची एक सुंदर गोष्ट या सिनेमाने दाखवली. अभिनेचा भूषण प्रधान आणि हिंदी अभिनेत्री निकीता दत्ता हे सिनेमात मुख्य भूमिकेत होते. तसंच अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने असे दिग्गज कलाकारही होते. नुकतंच निकीताने तिला मराठी इंडस्ट्रीबद्दल आवडणाऱ्या गोष्टी सांगितल्या.
नवरात्रीनिमित्त निकिता दत्ता एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा 'कलाकृती मीडिया'ला दिलेल्या मुलाखतीत निकिता म्हणाली, "मराठी इंडस्ट्रीत मला काही गोष्ट खूप आवडल्या ज्या मला वाटतं हिंदी इंडस्ट्रीत इतक्या बघायला मिळत नाहीत. एक म्हणजे कोणाही कलाकाराचा आदर करणं मला खूप आवडलं. आमच्या सेटवर सगळा क्रू महाराष्ट्रीयन होता. मी पहिल्यांदाच महाराष्ट्रीयन लोकांची संस्कृती इतक्या जवळून बघत होते. मला जाणवलं की एकमेकांप्रति इथे खूप प्रेम, आपलेपणा आणि आदर आहे. मग स्पॉट दादा असतील किंवा कॉस्च्युमवाले असो किंवा मग कलाकार असो प्रत्येकाबद्दलच ही भावना असते."
ती पुढे म्हणाली, "दुसरी गोष्ट मी पाहिली की मराठी माणूस आपल्या कला आणि संस्कृतीला घेऊन खूप संवेदनशील आहे. आम्ही शूट कर असताना सणासुदीच्या गोष्टी दाखवताना काहीही चूक व्हायला नको. मराठी लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळू शकत नाही. हे बघून मला खूप छान वाटलं. मराठी माणूस आपल्या संस्कृतीबद्दल खूपच शिस्तप्रिय आहे आणि म्हणूनच त्यांनी ती आजपर्यंत जिवंत ठेवली आहे. या दोन्ही गोष्टी मला खूप आवडल्या."