छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:02 IST2025-05-28T11:01:09+5:302025-05-28T11:02:18+5:30
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांनी यंदा एका खास व्यक्तीने दिलेली साडी नेसली. त्यामुळे पुन्हा एकदा छाया यांनी मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं

छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक
'फँड्री', 'सैराट' सिनेमातून भेटीला आलेल्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम. छाया सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलसंबंधी खास पोस्ट शेअर केली आहे. छाया यांनी गेल्या वर्षी आईची साडी नेसून कान्समध्ये हजेरी लावली होती. यावर्षी मात्र छाया यांनी नेसलेल्या साडीमागे एक खास कारण होतं.
छाया यांनी कान्सचे फोटो पोस्ट करुन सांगितलं की, "Cannes Film Festival आणि साडी हे जणू माझ्यासाठी एक सुंदर असे समीकरणच जुळून येत आहे . मागील वर्षी आईची साडी आणि नथ Cannes मध्ये मला घेऊन जाता आली याचा प्रचंड आनंद असतानाच यावर्षीच्या Cannes च्या निमित्ताने माझ्या गावच्या जिवाभावाच्या मैत्रिणींनी खूप मायेने मला भेट दिलेली ही साडी फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी मी जणू मोरपिसा सारखी पांघरूणच घेतली."
"मागच्या वर्षी Cannes मधून पुन्हा आले तेव्हा अनेक जवळच्या माणसांनी प्रेमाने - आपुलकीने माझा सत्कार केला. पण हा सत्कार माझ्यासाठी खास यासाठी होता की या सगळ्या जणींनी आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यातून वेळ काढून आजवरचा त्यांनी केलेला पहिला सत्कार होता. त्यामुळे माझ्यासोबतच त्यांनीही तो इतका दिलखुलास साजरा केला की त्यांचा आनंद त्यांच्या मनमुराद नाचण्यात - बागडण्यात आणि धिंगाणा घालण्यात दिसत होता. "
"आपली माणसं - त्यांचे प्रेम आणि त्यातून मिळणारी आपलेपणाची ऊब याचे मोल सातासमुद्रा पार देखील अमूल्यच असते. “गो ! तुम्ही दिलेली साडी नेस्हान. आईची नथ नाकात घालून आणि तिचेच कानातले घालून कान्सच्या समुद्रार लय मिरावलय.” अशी पोस्ट लिहून छाया कदम यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.