माणसाला चांगली भीती वाटायला हवी, हेमंत ढोमे आणि अमृता सुभाष यांच्यात रंगल्या ‘लोकमत मॅजेस्टिक गप्पा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:43 IST2026-04-12T14:38:36+5:302026-04-12T14:43:16+5:30
Lokmat Majestic Gappa: माणसाला नेहमी चांगली भीती वाटत राहायला हवी. मला ती सतत वाटते. नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाच्या आधी मला ती भीती वाटते. त्यामुळे तुमचे पाय जमिनीवर राहतात. अपयश पचवणे एक वेळ सोपे असते, पण यश पचवणे अवघड असते.

माणसाला चांगली भीती वाटायला हवी, हेमंत ढोमे आणि अमृता सुभाष यांच्यात रंगल्या ‘लोकमत मॅजेस्टिक गप्पा’
मुंबई - माणसाला नेहमी चांगली भीती वाटत राहायला हवी. मला ती सतत वाटते. नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाच्या आधी मला ती भीती वाटते. त्यामुळे तुमचे पाय जमिनीवर राहतात. अपयश पचवणे एक वेळ सोपे असते, पण यश पचवणे अवघड असते. यश एकदा डोक्यात गेले की कलाकार संपतो. खोट्या कौतुकाने तुमच्यातील कलाकाराची तिरडी कधी उचलली जाईल हे सांगता येत नाही, अशा शब्दात चित्रपटसृष्टीचे वास्तव प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांनी मांडले.
‘लोकमत मॅजेस्टिक गप्पा’ या कार्यक्रमात अमृता सुभाष आणि झिम्मा, क्रांतीज्योती सिनेमाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी नाटक, चित्रपट सृष्टीचा एक वेगळा पट प्रेक्षकांसमोर मांडला. आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, असे प्रत्येक कलावंताला वाटते. मला ज्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जिममध्ये गेले. आज तू येणार नाहीस असे वाटल्याचे माझे जिम इन्स्ट्रक्टर म्हणाले. पुरस्कार माझ्या अभिनयाला मिळाला होता. जिम माझ्या शरीराच्या मर्यादा दाखवते. त्यासाठी मला ती आवश्यक आहे. राष्ट्रीय पुरस्कारालाही कधीकधी गंज चढतो, असे माझा मित्र म्हणायचा. याचा अर्थ तो पुरस्कार देखील लोक विसरणार आहेत. ही भावना लक्षात घेऊन काम करत गेलो तर कधी अडचण येत नाही, असेही अमृता सुभाष यांनी सांगितले.
‘झिम्मा’ यशस्वी झाल्यावर पुन्हा त्या साच्यात अडकायचे नसल्याने ‘सनी’ बनवला, पण यश आले नाही. त्यामुळे ‘झिम्मा २’ हा हुकुमी एक्का काढला. त्यानंतर ‘फर्स्ट क्लास दाभाडे’ केला. तोदेखील चालला. आता तुला हवा तसा सिनेमा काढ, असे माझी पत्नी क्षिती म्हणाल्याने ‘क्रांतीज्योती विद्यालय’ बनवला. सध्या ‘झिम्मा ३’वर काम सुरू असल्याचे हेमंत ढोमे म्हणाले.
अमृताच्या आयुष्यात संदेश आणि माझ्या जीवनात क्षिती आल्याने दोघांची आयुष्यं परिपूर्ण झाल्याचे हेमंत म्हणाला. क्षिती आईसारखे समजावून सांगते. माज आल्यासारखे वागू नको. आपण अतिशय सामान्य आहोत. नॉमिनेशन-पुरस्कार मिळाले नाही तरी पुढे काम सुरू ठेव. ती प्रॅक्टिकल विचार करून स्पष्ट बोलते. जरा विनोदी लिही म्हणते. पण ती कधी कौतुकच करत नाही, असेही ढोमे म्हणाले. तर सगळे पती आपल्या पत्नीला दागिने देतात, पण संदेशने सशक्त भूमिका दिल्याचे अमृताने सांगितले. आईने कधी कौतुक केले नाही. संदेश डोक्यात यश जाऊ देत नाही, असेही त्यांनी सांगितले. अमृता सुभाष, हेमंत ढोमे, आ. संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी यांचा पुस्तक देऊन संपादक अतुल कुलकर्णी यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशय कोठावळे यांनी केले. कार्यक्रमाला भाजप संयोजक दिनेश झाला, सुधीर परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कलाकाराच्या आयुष्यात एक तरी ब्रह्मक्षण येतो
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक तरी ब्रह्मक्षण येतो. तो तुम्ही प्लॅन करू शकत नाही, असे सांगताना अमृता सुभाष यांनी किल्ला चित्रपटाचा अनुभव सांगितला. त्या चित्रपटाचा तरुण दिग्दर्शक अविनाश अरुण याने एका प्रसंगात मला चित्रपटातील माझ्या भूमिकेचे दुःख मी कसे मांडले पाहिजे, याविषयी जे सांगितले तो माझ्यासाठी ब्रह्मक्षण होता. तो असा ठरवून येत नाही. असा एखादा क्षण तुमच्या आयुष्यात येतो आणि जातो. तुम्ही त्यात न रमता पुढे आणखी काम करत जायला हवे, असेही त्या म्हणाल्या.