हिंदीमध्ये काम केल्यानंतर पुन्हा मराठीत काम करणं अवघड…; अभिनेते अशोक शिंदे असं का म्हणाले?
By सुजित शिर्के | Updated: March 18, 2025 11:14 IST2025-03-18T11:11:42+5:302025-03-18T11:14:13+5:30
मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून अशोक शिंदे यांना ओळखलं जातं

हिंदीमध्ये काम केल्यानंतर पुन्हा मराठीत काम करणं अवघड…; अभिनेते अशोक शिंदे असं का म्हणाले?
Ashok Shinde: वेगवेगळ्या मराठी मालिका, नाटक तसेच चित्रपटांमध्ये विविध धाठणीच्या भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे अशोक शिंदे. त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून त्यांना ओळखलं जातं.अशोक शिंदे यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत चित्रपटांमध्ये नायक आणि खलनायकी पात्रे साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीविषयी भाष्य केलं आहे.
अलिकडेच अशोक शिंदे यांनी 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी मराठी कलाकार जेव्हा हिंदी चित्रपटात काम करतो, तेव्हा त्याचा फायदा त्या कलाकाराला किती होतो त्यावर बोलताना अशोक शिंदे म्हणाले, "तुम्ही हिंदीत काय काम करताय म्हणजेच तुम्ही महेश मांजरेकरांसारखं काम करताय, किंवा श्रेयस तळपदे, मोहन जोशी नाना पाटेकर तसेच विक्रम गोखले आहेत या दिग्गज कलाकारांनी हिंदीत काम केलं आहे. त्याच्यानंतर तुमच्याबद्दलचा आदर वाढतो. त्यामुळे दुसरं वेगळं असं काही घडत नाही."
पुढे अभिनेते म्हणाले,"मराठी प्रेक्षकांचं तुमच्यावर असणारं प्रेम हे मराठीत काम केल्यानंतर जेवढं असतं तेवढंच असतं. फरक पडतो तो फक्त तुमच्या आर्थिक गोष्टींवर. म्हणजे जो माणूस १ रुपया घेत असेल तो १० हजारांवर जातो. जेव्हा तो माणूस हिंदीत यशस्वी होतो तेव्हा त्याच्यानंतर त्याला मराठीत काम करणं अवघड का जातं. कारण, त्याचे ते आकडे मराठी निर्मात्यांना परवडणारे नसतात. शिवाय वाढलेल्या अपेक्षा, तिकडची ट्रीटमेंट असं सगळं असतं. माझ्या दृष्टीने मराठी इंडस्ट्रीमध्येसुद्धा जवळपास हिंदीएवढीच ट्रीटमेंट दिली जाते."असा खुलासा त्यांनी केला.