दगडूला लॉटरी लागली! प्रथमेश परबची बॉलिवूड सिनेमात वर्णी, साकारणार मुख्य भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:21 IST2025-06-03T13:21:06+5:302025-06-03T13:21:29+5:30
प्रथमेशला लॉटरी लागली आहे. प्रथमेशची आणखी एका बॉलिवूड सिनेमात वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे या सिनेमात प्रथमेश मुख्य नायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दगडूला लॉटरी लागली! प्रथमेश परबची बॉलिवूड सिनेमात वर्णी, साकारणार मुख्य भूमिका
'टाइमपास' सिनेमामुळे प्रसिद्धी मिळवलेला आणि दगडूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रथमेशने अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत नाव कमावलं. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांमध्येही प्रथमेश झळकला. आता पुन्हा एकदा प्रथमेश हिंदी सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
प्रथमेशला लॉटरी लागली आहे. प्रथमेशची आणखी एका बॉलिवूड सिनेमात वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे या सिनेमात प्रथमेश मुख्य नायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहुर्त पार पडला. याचे फोटो शेअर करत प्रथमेशने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. प्रथमेशच्या या नव्या बॉलिवूड सिनेमाचं नाव 'पॉडर' असं आहे. "मुख्य नायक म्हणून माझा पहिला हिंदी सिनेमा. उत्सुक असण्यासोबतच थोडा नर्व्हसही आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रथमेशच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
'बालक पालक' या सिनेमातून प्रथमेशने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं होतं. या सिनेमात त्याने छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर 'टाइमपास' सिनेमातून मुख्य भूमिका साकारत त्याने अभिनयाची झलक दाखवली. 'टकाटक', 'डिलिव्हरी बॉय', 'डार्लिंग', 'उर्फी', 'लालबागची राणी' अशा अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. 'सिंघम' आणि 'सिंघम २' या बॉलिवूड सिनेमात प्रथमेश दिसला होता. या सिनेमांमध्ये त्याने अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर केली होती.