'सण जपण्याची जबाबदारी आपली'; राणादाने सांगितलं दिवाळीचं महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:33 PM2021-11-03T17:33:07+5:302021-11-03T17:35:24+5:30

Hardik joshi: काही कलाकारांसाठी ही दिवाळी खास असून त्यांनी त्यांचे काही अनुभवदेखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यातलाच एक अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी.

marathi actor hardik joshi share his diwali memories | 'सण जपण्याची जबाबदारी आपली'; राणादाने सांगितलं दिवाळीचं महत्त्व

'सण जपण्याची जबाबदारी आपली'; राणादाने सांगितलं दिवाळीचं महत्त्व

googlenewsNext

सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठांपासून प्रत्येक दारापुढे दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. विशेष म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण हा सण उत्साहात साजरा करत आहे. यामध्ये काही कलाकारांसाठी ही दिवाळी खास असून त्यांनी त्यांचे काही अनुभवदेखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यातलाच एक अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. राणादा अशी ओळख मिळवणारा हा हार्दिक सध्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. यंदा दिवाळीच्या निमित्ताने त्याच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"यंदाची दिवाळी मी माझ्या कुटुंबीयांसोबत साजरी करणार आहे. दरवर्षी मी आईला घरी साफसफाईसाठी, चकल्या आणि शंकरपाळ्या करायला मदत करतो. पण सध्या 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे  मला दिवाळीपूर्वी घरी जाता आलं नाही. पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मी घरी जाणार आहे. माझ्या मते, आपले सण जपण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. घरी मी दिवाळी ही पारंपरिक पद्धतीने साजरी करतो",  असं हार्दिक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून उटणं लावून अंघोळ करणं, कारेट फोडणं, मित्रपरिवाराला भेटणं त्यांच्या सोबत फराळाचा आस्वाद घेणं आशा प्रकारे मी दिवाळी साजरी करतो आणि आपण हा सण असाच पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे. जेणेकरुन पुढील पिढीमध्ये देखील हा सण सुट्टी म्हणून नाही तर एक सण म्हणून जीवंत राहील. तसंच फटाके फोडताना प्राण्यांची काळजी घ्या कारण फटाक्यांच्या आवाजाचा त्रास आपल्यापेक्षा ३ पटीने जास्त त्यांना होतो त्यामुळे माणुसकी जपून सण साजरा करा, एकत्र येऊन आनंदानं सण साजरा करा."

दरम्यान, हार्दिक जोशीने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. ही मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर आता हार्दिक 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत झळकत आहे.
 

Web Title: marathi actor hardik joshi share his diwali memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.