प्रगल्भ प्रेमाच्या लग्नघटिकेचा मुहूर्त

By Admin | Updated: November 14, 2015 01:48 IST2015-11-14T01:48:34+5:302015-11-14T01:48:34+5:30

प्रेमीजीवांचे प्रेम एकजीव झाले की त्या नोटवर चित्रपट संपतो, ही परंपरा बहुतांश चित्रपटांत पाळलेली दिसते आणि असाच शेवट पाहण्याची समाजमनाची मानसिकताही ठरून गेली आहे.

Mahurut | प्रगल्भ प्रेमाच्या लग्नघटिकेचा मुहूर्त

प्रगल्भ प्रेमाच्या लग्नघटिकेचा मुहूर्त

प्रेमीजीवांचे प्रेम एकजीव झाले की त्या नोटवर चित्रपट संपतो, ही परंपरा बहुतांश चित्रपटांत पाळलेली दिसते आणि असाच शेवट पाहण्याची समाजमनाची मानसिकताही ठरून गेली आहे. पण काही वर्षांपूर्वी आलेल्या 'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटाने मात्र प्रेमात पडलेल्या 'त्या दोघांचे' पुढे नक्की काय होणार, याची उत्कंठा लावून ठेवली होती. साहजिकच या चित्रपटाचा पुढचा भाग पाहण्यास रसिक उत्सुक होते. 'मुंबई-पुणे-मुंबई २' या चित्रपटाने ही उत्सुकता पाच वर्षे ताणून धरत आता प्रगल्भ झालेल्या या प्रेमाच्या लग्नघटिकेचा मुहूर्त साधला आहे.
मुळातच लग्न म्हटले की वधुवरांच्या मनात अनेक गोष्टींचे काहूर निर्माण होते. विशेषत: मुलीच्या मनातला गोंधळ जरा जास्तच असतो. अजूनतरी समाजरितीनुसार लग्नानंतर मुलगीच नव?्याच्या घरी जाणार हा रिवाज कायम असल्याने तिची मन:स्थिती बरीच वेगळी असते. या मुद्द्याला स्पर्श करत हा चित्रपट एक नवी कथा मांडतो. पहिल्या भागाचे हे एक्स्टेन्शन वाटत असले, तरी त्या भागातले केवळ काही संदर्भ घेत ही गोष्ट नवीन वाट चोखाळते. खरं तर, प्रेमाचे लग्नात झालेले रुपांतर आणि या सोहळ्याचे चांदणे पसरवणारा हा चित्रपट असला, तरी त्याला स्वतंत्र अशी कथा आहे. विशेष म्हणजे, यातल्या गौरीच्या मनात असलेला गोंधळ, यात तिच्या आधीच्या मित्राच्या एन्ट्रीने अजूनच वाढवला आहे. गौरीचे गौतमशी लग्न ठरले आहे आणि या लग्नाला आता काही दिवसच उरले आहेत. साहजिकच, दोन्हीकडच्या घरांमध्ये लगीनघाईला उधाण आले आहे. या अवधीत गौतम व गौरी यांच्या भेटीगाठी होत राहतात आणि त्यातून गौरीला गौतमच्या स्वभावातल्या काही उणीवा नव्याने जाणवतात. परिणामी, तिच्या मनाचा पुरता गोंधळ उडतो आणि तिच्या मनातल्या लग्नाच्या विचाराला त्याची थेट झळ पोहोचते. यातच तिचा जुना मित्र अर्णव, जो वास्तविक तिचा एक्स-बॉयफ्रेंड आहे, त्याची एन्ट्री तिच्या आयुष्यात होते. या नात्याला हलकासा स्पर्श करत आणि भावभावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत झुलणारी लगीनघाई पडद्यावर रंग भरते.
दिग्दर्शक सतीश राजवाडेला या चित्रपटातून सगळा लग्नसोहळा तर मांडायचा आहेच; पण त्याला आधीच्या भागाची कथाही पुढे न्यायची आहे. ही कामगिरी अश्विनी शेंडेने पटकथेतून अचूक पार पाडली आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीतून तयार झालेला हा चित्रपट रंजकतेची पाऊलवाट अलगद चालत राहतो. लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुलीच्या मनातले विचार या पटकथेतून ठोसपणे समोर येतात आणि दुसरीकडे, लग्नसोहळ्यात अडकलेल्या नातेवाईकांच्या व्यक्तिरेखाही तितक्यात ठसठशीतपणे दृगोच्चर होतात. गौरी व गौतमच्या नात्याची गुंफण दाखवताना अर्णवच्या पात्राचे प्रयोजन करून गोष्टीला दिलेला टच महत्त्वाचा ठरतो. पण या गोष्टीचा सरधोपट प्रेमत्रिकोण होणार नाही, हेही कौशल्याने पाहिले गेले आहे. चित्रपटाला सतीश राजवाडेचा खास स्पर्श आहे आणि चित्रपट कुठेही रेंगाळणार नाही याची त्याने दक्षता घेतली आहे. या चित्रपटाची कथा तशी स्वतंत्र असल्याने, मूळ 'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटाशी याची तुलना करण्याचा मोह आवरणे गरजेचे आहे. अन्यथा, या दुस?्या भागाची गोडी कमी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीने यातले स्वर-ताल सांभाळत मधुर गाणी दिली आहेत. सुहास गुजराथी यांचे नेटके छायांकन चित्रपटाला ताजेपणा बहाल करते. अभिनयाची सक्षम बाजू हे या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य आहे. मुक्ता बवेर्ने द्विधा मन:स्थितीत सापडलेली गौरी संवेदनशीलपणे रंगवली आहे आणि भावछटांचा उत्तम मिलाफ तिने ठसवला आहे. स्वप्नील जोशीने त्याच्या नेहमीच्या स्टाईलने यातला गौतम साकारला आहे. यात या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा वर्क झाली आहे. अंगद म्हसकरने अर्णवची व्यक्तिरेखा यथायोग्य साकारली आहे. प्रशांत दामले, विजय केंकरे, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, सुहास जोशी, आसावरी जोशी, श्रुती मराठे या मंडळींनी नातेवाईकांच्या गोतावळ्यात उत्साही रंग भरले आहेत. त्यामुळे हे सगळे व?्हाड आपुलकीने काठोकाठ भरलेले दिसते. दिवाळीच्या गोडधोड जिन्नसांत इतर चवींचाही थोडा हात असतो आणि तो रुचीबदलाला आवश्यक असतो. असा रुचीपालट घडवत या चित्रपटाने दिवाळी साजरी करण्याला प्राधान्य दिले आहे.

Web Title: Mahurut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.