सलमानच्या चाहत्यांसाठी प्रेम ही प्रेम...

By Admin | Updated: November 14, 2015 01:52 IST2015-11-14T01:52:33+5:302015-11-14T01:52:33+5:30

राजश्री प्रॉडक्शनला प्रामुख्याने कौटुुंबिक चित्रपटाची परंपरा आहे. १९८९ ला ‘मैने प्यार किया’पासून

Love for love for fans of Salman ... | सलमानच्या चाहत्यांसाठी प्रेम ही प्रेम...

सलमानच्या चाहत्यांसाठी प्रेम ही प्रेम...

राजश्री प्रॉडक्शनला प्रामुख्याने कौटुुंबिक चित्रपटाची परंपरा आहे. १९८९ ला ‘मैने प्यार किया’पासून सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आणि राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे स्वरूपच बदलून गेले. अर्थात सूरज बडजात्या यांच्या चित्रपटातूनही कौटुंबिक संस्कारालाच प्रमुख स्थान देण्यात आलेले आहे; पण त्यांच्या चित्रपटांचे कथानक हे प्रेक्षकांच्या भावभावनांना स्पर्श करणारे दिसून आले आहे. प्रेम रतन धन पायो हाही त्याच पठडीतला चित्रपट आहे. यातही कौटुंबिक संस्काराला प्राधान्य देण्यात आले आहे. सलमान खानची भूमिका या चित्रपटातही अविस्मरणीय अशीच आहे. १९९९ मध्ये आलेल्या हम साथ साथ है या चित्रपटानंतर सलमान पुन्हा एकदा प्रेमच्या भूमिकेत या चित्रपटात दिसला आहे.
चित्रपटाचे कथानक एका आधुनिक शाही राजघराण्याशी संबंधित आहे. यातील प्रिन्स आहे विजय सिंह (सलमान खान). त्याचा सावत्र भाऊ (नील नितीन मुकेश) हा आपला मित्र (अरमान कोहली) याच्या मदतीने विजयच्या जागेवर राजघराण्याचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणजे विजय सिंहला मार्गातून हटविण्यासाठी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो. यातून विजय सिंह बचावतो. शाही परिवाराचे इमानदार दिवाण (अनुपम खेर) विजयला सुरक्षित जागी घेऊन जातात. तेथे विजयवर उपचारही केले जातात. या हल्ल्यानंतर चार दिवसातच विजयला महाराजांच्या सिंहासनावर बसविण्यात येणार असते आणि या सोहळ्यासाठी मैथिली (सोनम कपूर) येणार असते. जिचा विजयशी विवाह निश्चित झालेला आहे. मैथिली एक समाजसेवी संघटना चालवीत असते. या शाही महलपासून दूर अयोध्येत राहणारा प्रेम (विजयसारखाच दिसणारा अन्य एक जण अर्थात सलमान खान) मैथिलीला भेटून त्यांच्या संघटनेसाठी मदत करू इच्छित आहे. मैथिलीला भेटण्यासाठी प्रेम त्या ठिकाणी पोहोचतो जेथे विजयचा राज्याभिषेक होणार असतो. परिस्थिती पाहून दिवाणजी प्रेमला प्रिन्स विजय म्हणून समोर आणतात. विजयच्या स्वभावामुळे नाराज असणाऱ्या मैथिलीला प्रेमच्या सरळ साध्या स्वभावातून प्रेमाचे ते क्षण मिळतात जे तिला विजयकडून कधीच मिळाले नाहीत. विजयच्याऐवजी प्रेमचाच राज्याभिषेक होतो. तिकडे विजयचे दुश्मन पुन्हा एकदा त्याच्यावर प्राणघातक हल्ला करतात आणि त्याला कैद करण्यात यशस्वी होतात. मात्र, दुश्मनांची चाल यशस्वी होत नाही. प्रेमच्या पुढाकारातून विजय व त्याच्या सावत्र भावांमधील दुरावा कमी होतो आणि राजघराण्याच्या दुश्मनांना कायमचा धडा शिकविला जातो. पूर्ण शाही परिवार पुन्हा एकत्र येतो. विजय परत आल्यानंतर प्रेम आपल्या घरी जाण्याची तयारी सुरू करतो; पण मैथिलीचे प्रेमबद्दलचे आकर्षण तिला अस्वस्थ करते. या परिवारासाठी प्रेमने केलेल्या त्यागाची जाणीव विजयला होते. सर्व जण प्रेमला आपल्या कुटुंबाचा एक घटक बनवितात.
कौटुंबिक चित्रपटाचा पूर्ण मसाला यात आहे. एक सरळ साधी प्रेमसारखी व्यक्ती एका राजघराण्याला नात्यांच्या बंधनात बांधते. तुटलेले आणि नंतर जोडले गेलेले नाते यांचे सिन प्रेक्षकांना निश्चितच वेगळी अनुभूती देतात. दोन भूमिकांतील सलमान यात दिसतो.
विशेष म्हणजे प्रेमच्या भूमिकेतील सलमान प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतो. मैथिलीच्या भूमिकेतील सोनम कपूर अभिनय, सौंदर्यातही बाजी मारून गेली आहे. टायटल साँगच्या लोकप्रियतेने हिमेश रेशमियांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. शाही महलाची भव्यता डोळे दिपवणारी आहे.
का पाहावा?
प्रेम अर्थात सलमान खानसाठी आणि सोनमचे सौंदर्य, अभिनयासाठी.

का पाहू नये?
शाही घराण्याचे कथानक आणि लांबत जाणारा चित्रपट याला फक्त सलमानचे चाहतेच दुर्लक्षित करू शकतात.
उणिवा : लांबत जाणारा चित्रपट हीच चित्रपटाची सर्वात मोठी उणीव आहे. राजघराणे, दोन सावत्र भाऊ, इमानदार दिवाण हे कथानक तसे १९७० ते १९८० च्या दशकात अनेक चित्रपटात दिसून येते. २०१५ च्या तरुण प्रेक्षकांना हे कथानक कितपत रुचेल हे सांगता येत नाही. चित्रपट संथपणे पुढे जात राहतो. मध्यंतरानंतर कथानकाला वेग येतो. टायटल साँग सोडले तर अन्य गाणी लक्षात राहत नाहीत. सलमान आणि सोनम कपूर वगळता कोणाचाही फारसा प्रभाव पडत नाही. एकूणच काय, तर सबकुछ सलमान खान असेच काहीसे चित्र आहे.

Web Title: Love for love for fans of Salman ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.