प्रेम पुन्हा येतोय...

By Admin | Updated: November 10, 2015 11:17 IST2015-11-10T02:53:39+5:302015-11-10T11:17:03+5:30

राजश्री प्रॉडक्शनच्या १९९९ मध्ये रीलिज झालेल्या ‘हम साथ साथ हैं’ नंतर पुन्हा दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि त्यांचा प्रेम सलमान खान यांची टीम ‘पे्रम रतन धन पायो’

Love is coming again | प्रेम पुन्हा येतोय...

प्रेम पुन्हा येतोय...

राजश्री प्रॉडक्शनच्या १९९९ मध्ये रीलिज झालेल्या ‘हम साथ साथ हैं’ नंतर पुन्हा दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि त्यांचा प्रेम सलमान खान यांची टीम ‘पे्रम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपावलीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे. सलमान खान आणि सूरज बडजात्या यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय टीमशी साधलेला हा संवाद...
च् प्रेमचा प्रवास
‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘हम साथ साथ हैं’नंतर चौथ्यांदा सलमानला प्रेमच्या रूपात सादर करण्यात येत असल्याबद्दल सूरज बडजात्या यांना प्रश्न केला, तेव्हा ते म्हणाले की, ‘प्रेमसोबतचा माझा प्रवास अविस्मरणीय आहे. प्रेम हा सरळ साधा आहे. त्याला दुनियादारीची जास्त जाण नाही. ‘हम आपके हैं कौन’मधील प्रेम कुटुंबासोबत रमणारा होता. ‘हम साथ साथ हैं’मधील प्रेमला दुनियादारी समजण्यास सुरुवात झाली. आता ‘प्रेम रतन धन पायो’मधील प्रेम इतका समंजस आहे की, त्याला प्रत्येक समस्या सोडवता येते.’ यावर सलमान खान म्हणतो की, ‘प्रेमला सूरज यांच्यापेक्षा चांगले कोण समजून घेऊ शकते? एक काळ असा होता की, प्रेम नाव सहसा कोणी ठेवत नसे आणि बॉलीवूडमध्ये तर प्रेमचे प्रकरण वेगळेच आहे. (प्रेम चोप्रा यांच्याकडे इशारा) ‘मैने प्यार किया’च्या प्रेमने या संकल्पनेत बदल केला आणि लोकांनीही मुलांचे नाव प्रेम ठेवण्यास सुरुवात केली.’
च् सफलतेबाबत आत्मविश्वास
‘प्रेम रतन धन पायो’बाबत टीमला पूर्ण आत्मविश्वास आहे. सूरज बडजात्या म्हणतात की, ‘एखादा चित्रपट जेव्हा झोकून देऊन बनविला जातो, तेव्हा दुसऱ्या कोणत्या गोष्टींना थाराच उरत नाही. हा चित्रपट पाहून जर कोणी आपल्या आईला हा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जात असेल, तर आम्ही समजू की परिश्रमाचे सार्थक झाले.’ सलमान खानही म्हणतो की, ‘आमचे चित्रपट कुटुंबाला जोडण्याचे काम करतात आणि आताच्या काळात ती खूप मोठी गोष्ट आहे.’
च् कशी झाली सुरुवात?
‘प्रेम रतन धन पायो’ची सुरुवात कधी आणि कशी झाली? यावर सूरज बडजात्या म्हणतात की, ‘हम आपके हैं कौन तयार होत असताना शूटिंगमध्ये सात ते आठ महिन्यांचा गॅप होता. त्यावेळेस आम्ही अशी चर्चा करीत होतो की, या काळात एखादा छोटा चित्रपट तयार केला जाऊ शकतो का? त्यासाठी एक कथानकही समोर आले होते. त्यावेळी आम्ही त्यावर काम करू शकलो नाही, पण ही गोष्ट आम्ही विसरलो नाही. २०११ मध्ये मी यावर काम सुरू केले. २०१२ पर्यंत लेखनाचे काम सुरू होते. नंतर मी सलमान खानला हे कथानक सुचविले आणि तो तयार झाला.’ यावर सलमान म्हणाला की, ‘सूरज यांची निवड खूपच वेगळी असते. मला आठवते की, माझ्या घरीच यावर प्रथम चर्चा झाली. सूरज बडजात्या यांनी पूर्ण कथानक ऐकवले. मी तर थक्कच झालो. माझ्या बहिणीकडे मी बघितले, तर तिचीही हीच प्रतिक्रिया होती की, हा चित्रपट खूप यशस्वी होईल. त्यानंतर एनडी स्टुडिओत महलचा सेट लावण्यात आला, जेथे आम्ही नॉन स्टॉप शूटिंग केलं.’
च् शीशमहलचे आकर्षण
सलमान खान सांगतो की, ‘शीशमहल हे या चित्रपटाचे खास आकर्षण असेल. तो मुघल-ए-आजमची आठवण करून देईल. भव्यतेत शीशमहल मुघल-ए-आजमपेक्षा एक पाऊल पुढे आहे. तो पाहून लोक चकित होतील. शूटिंग पूर्ण झाल्यावर महल तोडण्यात आला, तेव्हा मला वाईट वाटले.’
च् कोण आहे प्रेम?
चित्रपटाच्या कथानकाचा विषय निघाला, तेव्हा बडजात्या यांनी फक्त काही संकेत दिले. त्यावरून असे दिसते की, पे्रम एक सामान्य युवक आहे. जो छोट्या भागातून शहरात येतो. रामलीलाच्या दरम्यान तो तुलसीदास यांच्या रामायणातील दोहे ऐकतो. येथूनच प्रेमचा प्रवास सुरू होतो. चित्रपटात सलमानचा डबल रोल असल्याचे सांगण्यात येत आहे, पण सलमान आणि सूरज हे यावरही सस्पेन्स ठेवून आहेत. ते म्हणतात, ‘चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पाहा.’
च् प्रिन्सेस सोनम कपूर
सोनम कपूर प्रथमच या टीमसोबत काम करीत आहे. या चित्रपटात ती प्रिन्सेसच्या रोलमध्ये आहे. सोनमच्या निवडीबाबत बडजात्या सांगतात, ‘हिरोईनसाठी त्यावेळी अनेक नावे समोर आली. याच दरम्यान सोनमचा ‘रांझना’ आला. तो पाहिला आणि आमच्या चित्रपटासाठी प्रिन्सेस मिळाली. एक प्रिन्सेस रिलेशनशिप कशी हँडल करते, हे यात दाखविले आहे.’
चौथा प्रेम : १९८९ मधील ‘राजश्री’च्या ‘मैने प्यार किया’ने सलमानला वेगळी ओळख दिली, तर बडजात्या यांच्या यशस्वी दिग्दर्शनाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. याच चित्रपटाने सलमानला प्रेम हे नाव दिले. १९९४ मध्ये ‘हम आपके है कौन’च्या माध्यमातून सलमान आणि सूरज यांच्या जोडीने इतिहास रचला. विवाहाचा व्हिडीओ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर नवे विक्रम रचले. या चित्रपटातही सलमान प्रेमच्याच भूमिकेत होता. १९९९ मध्ये सूरज बडजात्या यांनी सलमानला ‘हम साथ साथ है’ मध्ये पुन्हा प्रेमचा रोल दिला. हा चित्रपटही हिट झाला. आता १६ वर्षांनंतर पुन्हा सलमान आणि बडजात्या यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कोण आहे उत्कृष्ट जोडीदार
सलमानने प्रेमच्या भूमिकेत असताना, आतापर्यंत भाग्यश्री, माधुरी दीक्षितसोबत काम केलेले आहे. आता सोनमसोबत तो या चित्रपटात दिसणार आहे. पे्रमची सर्वात चांगली जोडीदार कोण, असा प्रश्न केल्यावर सलमान म्हणतो की, ‘प्रेमची सर्वात उत्कृष्ट जोडीदार सोनमच आहे.’
पाऊस आणि शूटिंग : सलमान खान म्हणाला, ‘शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात अचानक पाऊस सुरू झाला. पॅलेसमध्ये शूटिंग सुरू होतं. शेवटच्या तीन दिवसांत तर आम्ही शूटिंग सुरू केलं की, पाऊस थांबायचा. लंचमध्ये पाऊस पुन्हा सुरू व्हायचा. लंचनंतर शूटिंग सुरू झालं की, पाऊस पुन्हा थांबायचा. पॅकअपनंतर मुसळधार पाऊस सुरू व्हायचा.’
कोण आहे रोमँटिक?
सूरज बडजात्या हे वैयक्तिक आयुष्यात लाजाळू असल्याचे सांगितले जाते. सलमानने काही दिवसांपूर्वीच त्यांना सर्वात रोमँटिक म्हणून संबोधले होते. यावर फिरकी घेताना सलमान म्हणतो की, ‘सूरज हे प्रत्येक चित्रपटात किती रोमान्स घेऊन येतात, ते आपण पाहिलेच आहे. रोमँटिक व्यक्तीच हे करू शकते. त्यांच्याइतकी रोमँटिक व्यक्ती मी पाहिली नाही.’

Web Title: Love is coming again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.