कोल्हापूरच्या दिलीप रोकडेने केले छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शन, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास

By संदीप आडनाईक | Updated: February 22, 2025 18:15 IST2025-02-22T18:14:35+5:302025-02-22T18:15:14+5:30

ज्यूसच्या हातगाडीवर अर्धवेळ नोकरी 

Kolhapur Dilip Rokde has done the art direction for Chhaava | कोल्हापूरच्या दिलीप रोकडेने केले छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शन, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास

कोल्हापूरच्या दिलीप रोकडेने केले छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शन, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' हा ऐतिहासिक हिंदी चित्रपट देशविदेशांतील चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. गेले आठवडाभर या चित्रपटाचीच हवा आहे. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतमजुराचा पोरगा गेल्या १२ वर्षांपासून बॉलिवूड गाजवतोय. राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द या छोट्याशा खेड्यातील दिलीप गणपती रोकडे या तरुणाचा 'रावडी राठोड' ते 'छावा' हा प्रवास थक्क करणारा आहे.

तारळे खुर्द येथील गणपती दत्तात्रय रोकडे आणि शांताबाई या भूमिहीन शेतमजूर दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या दिलीपचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कसबा तारळे येथील न्यू हायस्कूलमध्ये झाले आहे. शाळेतच चित्रकलेबरोबर थ्रीडी मॉडेल बनविणे, गणेश उत्सवात कलात्मक सजावट करणे यात त्याचा हातखंडा होता. कोल्हापुरात कला निकेतनमध्ये एटीडी पदविका करण्यासाठी प्रवेश घेतला. 

ज्यूसच्या हातगाडीवर अर्धवेळ नोकरी 

या काळात त्याने महिना ६०० रुपये पगारावर ज्यूसच्या हातगाडीवर अर्धवेळ नोकरी केली. गुणवत्तेच्या जोरावर त्याला २००६ मध्ये मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश मिळाला. कोल्हापूर आणि मुंबईत त्याने पडेल ती छोटी मोठी कामे केली. २०१२ मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्टमधून डिझायनिंगची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला थेट संजय लीला भन्साळी ग्रुपच्या प्रोडक्शनमध्ये 'रावडी राठोड' या चित्रपटासाठी संधी मिळाली. येथे त्याचा सुरुवातीचा पगार महिना ६५ हजार रुपये होता.

'छावा'मध्ये डिझाईनचे काम

छावा चित्रपटामधील भव्य दिव्य दृश्यासाठी लागणारे डिझाईन करण्याचे मुख्य काम दिलीपने केले आहे. कला दिग्दर्शक वासिक खान यांच्यामुळे त्याला मोठे बॅनरचे चित्रपट मिळाले. त्याने रामलीला, तनु वेड्स मनू २, पद्मावत, सुपर थर्टी, फँटम, महाराज, तेजस, भूतनाथ २ चे कलादिग्दर्शन केले आहे.

Web Title: Kolhapur Dilip Rokde has done the art direction for Chhaava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.