कानफटात मारली, आता माफी मागा!
By Admin | Updated: December 1, 2015 01:10 IST2015-12-01T01:10:32+5:302015-12-01T01:10:32+5:30
ज्येष्ठ अभिनेते माजी खासदार गोविंदा यांना २००८मध्ये एका चाहत्याला थापड मारल्याबद्दल त्याची माफी मागण्यास सांगत सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक आयुष्यातील

कानफटात मारली, आता माफी मागा!
नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते माजी खासदार गोविंदा यांना २००८मध्ये एका चाहत्याला थापड मारल्याबद्दल त्याची माफी मागण्यास सांगत सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक आयुष्यातील वर्तणुकीबद्दल खडे बोल सुनावले आहेत.
प्रकरण तसे जुजबी असले, तरी तक्रारकर्ते संतोष राय यांनी कायदेशीर लढा देत गोविंदा यांना थेट सर्वोच्च न्यायालयात खेचले. हा वाद आपसात मिटवा, असा सल्ला न्या. तीरथसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने दिला आहे. ‘आप बडे हीरो हैै, बडा दिल भी दिखाईये’ असा टोलाही न्यायाधीशांनी मारला.
गोविंदा यांनी गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा हवाला देत उच्च न्यायालयाने राय यांची याचिका निकाली काढली होती. गोविंदा हे राय यांना कानशिलात मारत असल्याची व्हिडीओ क्लिप मोबाइलवर बघितल्यानंतर न्यायाधीशांनी गोविंदा यांना तक्रारकर्त्याची माफी मागण्याचा सल्ला दिला. गोविंदासारख्या अभिनेत्याने सार्वजनिक स्थळी मारहाण करायला नको होती. चित्रपटात तुम्ही जे करता (रील लाइफ) ते सर्व प्रत्यक्ष आयुष्यात करण्याची (रीयल लाइफ) गरज नसते. आम्ही तुमच्या चित्रपटांचा आनंद लुटत असतो, मात्र तुम्ही कुणाला चपराक लगावाल हे सहन करू शकत नाही, असेही न्यायाधीशांनी सुनावले. या प्रकरणी पुढील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी होत आहे. (वृत्तसंस्था)
चित्रपटाच्या सेटवरील घटना...
संतोष राय हे १६ जानेवारी २००८ रोजी ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटाच्या सेटवर गेले असता गोविंदा यांनी त्यांना येण्याचे कारण विचारत थापड मारल्याचे दृश्य व्हिडीओ क्लिपिंगमध्ये दिसून येते.
राय यांनी २ फेब्रुवारी २००९ रोजी गोविंदा यांच्याविरुद्ध हेतुपुरस्सर जखमी करणे, शांतता भंग करण्यासाठी अपमानित करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती.
महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेली खटल्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठी गोविंदा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने २०१३मध्ये ही तक्रार खारीज केली होती.