"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:18 IST2025-11-05T11:17:48+5:302025-11-05T11:18:43+5:30
मराठी अभिनेत्याच्या बायकोबद्दल ट्रोलरने खालच्या पातळीला जाऊन केली टीका

"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
सोशल मीडियावर कलाकार ट्रोल होणं आता काही नवीन नाही. मात्र काही ट्रोलर्स मर्यादा पार करतात आणि वाईट भाषेत ट्रोल करतात. मराठी कलाकारांनाही अनेकदा याचा अनुभव आला आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता कपिल होनरावच्या बायकोबद्दल एका ट्रोलरने वाईट भाषेत टीका केली. कपिलने सोशल मीडियावर थेट स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्याने ट्रोलरला सडेतोड उत्तरही दिलं आहे.
अभिनेता कपिल होनरावने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं. त्याने गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. नव्या घरात वास्तुशांतीची पूजाही झाली. व्हिडीओमध्ये कपिलसोबत त्याची बायकोही आहे. गुलाबी साडीत ती सुंदर दिसत आहे. कपिलच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, 'हॊनराव म्हंजी तू मराठी ना ? बायको भैयेणी आहे काय ? एररर अरे महाराष्ट्र आपला हाये आपन महाराष्टातले या रिक्षा वाल्यानी आदीच गर्दी केल्ये पुजा तरी आपल्या पंडित ला घेऊन करायचिकी काय अभिमान हाये कि नै महाराटशाचा'.
नेटकऱ्याने ज्याप्रकारे अशुद्ध मराठी लिहिलं आहे त्यावरुन आणि बायकोवर टीका केल्यावरुन कपिल भडकला. त्याने या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले,'काय करायचं ह्याचं...ह्याला महाराष्ट्र नीट लिहिता ही येत नाही. लवकर बरा हो xxx कलाकारांना ट्रोल करण्याची पातळी आणखी खालच्या थराला जात आहे'.

कपिलचं हे घर मुंबई़तील अंधेरी या प्राइम लोकेशनवर आहे. गावाहून मुंबईत आल्यानंतर अंधेरीत १० बाय १०च्या खोलीत राहणाऱ्या कपिलने स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता त्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. त्याच्या या घराची किंमत ही कोटींच्या घरात आहे. तसंच कपिलची बायको ही महाराष्ट्रातली नाही. ती हिंदी भाषिक आहे. याआधीही कपिलला करवा चौथ सण साजरा करण्यावरूनही ट्रोल केलं गेलं होतं. त्यावरही तेव्हा त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं होतं.