ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:17 IST2025-08-17T11:14:34+5:302025-08-17T11:17:15+5:30
ज्योती चांदेकर यांची एक भूमिका इतकी गाजली की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याची दखल घेतली.

ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
ज्योती चांदेकर यांंचं काल (१६ ऑगस्ट) निधन झालं. त्यामुळे सर्वांना चांगलाच धक्का बसला. ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत विविध सिनेमा, मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. पण ज्योती यांची एक भूमिका मात्र अजरामर झाली. या भूमिकेने त्यांना जागतिक स्तरावर किर्ती मिळवून दिली. इतकंच नव्हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या भूमिकेची दखल घेतली. कोणती होती ती भूमिका आणि तो सिनेमा?
बाळासाहेब ठाकरेंनी घेतली ज्योती यांच्या भूमिकेची दखल
२०१० साली आलेला 'मी सिंधूताई सपकाळ' हा सिनेमा चांगलाच गाजला. अनंत महादेवन दिग्दर्शित या सिनेमाच्या माध्यमातून सिंधूताईंचं सामाजिक कार्य जगभरात पोहोचलं. या सिनेमात ज्योती चांदेकर यांनी सिंधूताई सपकाळ यांची भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे त्यांची लेक अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही सिंधूताईंच्या तरुणपणीची भूमिका साकारली. दोन्ही माय-लेकींनी या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाची बाळासाहेब ठाकरेंनीही दखल घेतली. त्यांनीही या सिनेमाचं आणि ज्योती यांच्या अभिनयाचं कौतुक केलं.
ममता सिंधूताई सपकाळ यांनी हा फोटो आणि ज्योती यांची आठवण पोस्ट करुन लिहिलंय की, "या फोटोत बाळासाहेबांच्या एका बाजूला आई आहे आणि एका बाजूला ज्योती ताई आहेत. ताई, इतकी घाई का केलीत.." हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्योती चांदेकर यांच्या निधनाने शोककळा
अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर सध्या ठरलं तर मग मालिकेत काम करत होत्या. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या पुण्याला गेल्या होत्या. तिथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. गेल्या वर्षी मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्या सेटवर आजारी पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झालं होतं. तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर त्या पुन्हा मालिकेत परतल्या होत्या.