५० वर्षे झालीत...पण अशोक सराफ यांनी ती अंगठी बोटातून कधीच काढली नाही...!, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:42 IST2025-10-01T16:41:27+5:302025-10-01T16:42:37+5:30
Ashok Saraf : अशोक मामांच्या आयुष्यातले अनेक किस्से प्रसिद्ध आहेत आणि त्यापैकीच एक आहे त्यांच्या अंगठीचा किस्सा. गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी आपल्या बोटातली ती अंगठी कधीही काढलेली नाही.

५० वर्षे झालीत...पण अशोक सराफ यांनी ती अंगठी बोटातून कधीच काढली नाही...!, जाणून घ्या याबद्दल
अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आजवर ५० हून अधिक हिंदी चित्रपट, जवळपास २०० मराठी सिनेमे, १५ टीव्ही मालिका आणि २५ नाटकांमध्ये काम केले असून, ५० हून अधिक पुरस्कारही त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा हा अफाट प्रवास आजही सुरू आहे. अशोक मामांच्या आयुष्यातले अनेक किस्से प्रसिद्ध आहेत आणि त्यापैकीच एक आहे त्यांच्या अंगठीचा किस्सा. गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी आपल्या बोटातली ती अंगठी कधीही काढलेली नाही, हे विशेष. ही अंगठी त्यांच्यासाठी केवळ एक दागिना नसून, त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आणि त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाचा जणू एक अविभाज्य भाग बनली आहे.
अशोक सराफ यांच्या बोटातील एक अंगठी गेली ५० वर्षे त्यांची अविभाज्य साथ देत आहे. ही केवळ एक अंगठी नसून, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आणि एका खास मैत्रीचा लकी चार्म आहे. हा किस्सा आहे १९७४ सालचा. अशोक सराफ यांचे मेकअप आर्टिस्ट असलेले मित्र विजय लवेकर यांचे सोन्याचे छोटे दुकान होते. विजय लवेकर यांनी बनवलेल्या काही खास डिझाईन्सच्या अंगठ्या घेऊन ते स्टुडिओमध्ये आले होते. विजय यांनी अशोक मामांना त्या बॉक्समधील एक अंगठी निवडण्यास सांगितले. अशोक मामांनी पटकन एक अंगठी उचलली आणि ती त्यांच्या करंगळीच्या बाजूच्या बोटात घातली. विशेष म्हणजे, ती अंगठी त्यांच्या बोटात अगदी फिट्ट बसली. त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरलेली होती. अंगठीकडे पाहताच, "आता ही अंगठी माझी!" अशी प्रतिक्रिया त्यांनी विजयला दिली.
'पांडू हवालदार'ची ऑफर आणि यशाची कलाटणी
अंगठी घातल्यानंतर बरोबर तीन दिवसांनी एक मोठा बदल घडला. त्यापूर्वी अशोक सराफ यांच्या अभिनयाची कारकीर्द थोडी संथ गतीने सुरू होती. पण या अंगठीची कमाल म्हणा किंवा योगायोग, तिसऱ्याच दिवशी त्यांच्या वाट्याला 'पांडू हवालदार' या चित्रपटाची ऑफर चालून आली. या चित्रपटामुळेच अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला खरी कलाटणी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला.
५० वर्षांचा न काढण्याचा निर्धार
या घटनेमुळे अशोक मामांची या अंगठीवर तीव्र श्रद्धा बसली. ते म्हणतात, "यावर माझी श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा काहीही म्हणा, पण ही अंगठी बोटातून काढायची नाही असा मी निर्णय घेतला." आज ५० वर्षे झाली, पण ती नटराजाची अंगठी अशोक मामांच्या बोटात तेव्हा घातली तशीच आजही आहे. ही अंगठी त्यांच्यासाठी केवळ 'लकी चार्म' नसून, त्यांच्या यशस्वी प्रवासाची एक गोड आठवण आहे.