इरफानला करायचाय मराठी चित्रपट

By Admin | Updated: May 27, 2016 02:21 IST2016-05-27T02:21:40+5:302016-05-27T02:21:40+5:30

‘सैराट’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. सैराटला मिळालेल्या यशामुळे सध्या इरफान खानही खूप आनंदात आहे. मराठी चित्रपट दिवसेंदिवस प्रगती करत आहे.

Irrfan's Marathi film | इरफानला करायचाय मराठी चित्रपट

इरफानला करायचाय मराठी चित्रपट

‘सैराट’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. सैराटला मिळालेल्या यशामुळे सध्या इरफान खानही खूप आनंदात आहे. मराठी चित्रपट दिवसेंदिवस प्रगती करत आहे. मराठीचे हे यश खरेच कौतुक करण्यासारखे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. सध्या इरफान ‘मदारी’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान मलाही मराठी चित्रपटात काम करायचे आहे, असे मत इरफानने व्यक्त केले आहे. ‘सीएनएक्स’च्या एडिटर जान्हवी सामंत यांच्याशी त्याने साधलेला हा संवाद.

इरफान खान आज केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर हॉलीवूडमध्येही अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. इरफानने आपल्या अभिनयातून एक वेगळा ठसा उमटवला आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर इरफानला आता मराठीत काम करण्याची इच्छा आहे.

सैराट या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवरही खूप चांगली कमाई करत आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने आपल्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी आणि कुटुंबीयांसाठी सैराटच्या खास स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. हा चित्रपट त्याला प्रचंड आवडला असल्याचे तो सांगतो. इरफानने याआधीही अनेक मराठी चित्रपट पाहिले आहेत. फँड्री, किल्ला, विहीर, कोर्ट हे मराठी चित्रपट त्याला खूप आवडतात. नागराज मंजुळेचा तर मी फॅन आहे असे तो सांगतो. तसेच अभिनेता नाना पाटेकर यांना नटसम्राट या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला पाहिजे होता असे त्याला वाटते. मी परीक्षक मंडळात असतो तर मी नक्कीच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला असता असे तो सांगतो. मराठीत अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. मराठी प्रेक्षक हा अतिशय सजग आहे. त्यामुळे मराठीतील निर्मात्यांनी चांगल्या विषयांवरचे चित्रपट बनवले पाहिजेत असे त्याचे म्हणणे आहे. मराठी सिनेमांची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती पाहता इरफानला मराठी सिनेमा करण्याची इच्छा आहे. एखादी चांगली संकल्पना असल्यास मराठी चित्रपटात नक्कीच काम करेन. तसेच चित्रपटासाठी मराठीही शिकेन असे त्याचे म्हणणे आहे. इरफानला सध्या मराठी भाषा कळत नाही, तसेच त्याला मराठीत बोलायलाही येत नाही. पण चित्रपटासाठी मराठी भाषेवर मेहनत घ्यायलाही तो तयार आहे. मराठीत येत असलेल्या नवीन दिग्दर्शकांमुळे खूप चांगले विषय मराठीत हाताळले जात आहेत याचा त्याला आनंद होत असल्याचे तो सांगतो. इरफानचे मराठी चित्रपटांविषयी प्रेम पाहता पुढील काही काळात इरफान नक्कीच एखाद्या मराठी चित्रपटात झळकेल यात काही शंका नाही.

- janhavi.samant@lokmat.com

 

Web Title: Irrfan's Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.